राज्य सरकारच्या विविध विभागात बाह्य यंत्रणेद्वारे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरतीऐवजी `एमपीएससी’द्वारे भरती करावी, अशी मागणी कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत आज औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली.
राज्य सरकारतर्फे बाह्य यंत्रणेद्वारे कंत्राटी भरती केली जात आहे. सध्या राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये दोन लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत. तर राज्यात ७ ते ८ लाख विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सरकारी नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र, तूर्त `एमपीएससी’कडून अवघ्या २ हजार पदांवर नियुक्ती केली जात आहे. अशा परिस्थितीत लाखो विद्यार्थी संधीपासून वंचित राहत आहेत. विशेषत: कंत्राटी पद्धतीत आरक्षणही डावलले जात असून, अनेक पदांवर सेवानिवृत्त अधिकारी वा कर्मचाऱ्यांची नियुक्ती होत आहे. या प्रकारामुळे स्पर्धा परीक्षा देणारे लाखो विद्यार्थी हतबल झाले आहेत.
तरी या संदर्भात राज्य सरकारने गंभीर दखल घेऊन कंत्राटी पद्धतीने भरतीऐवजी `एमपीएससी’द्वारे परीक्षा घेऊन निवड प्रक्रिया राबवावी, अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी केली.