(मुंबई)
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गौतम अदानी प्रकरणावरून विरोधकांना सुनावत भाजपला अप्रत्यक्षरित्या पाठिंबा दिला आहे. यामुळे ठाकरे सेनेसह कॉंग्रेसच्या गोटात अस्वस्थतता आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीच्या विषयावरून देखील राष्ट्रवादीने मोदींचा बचाव केला आहे. त्यामुळं आता गेल्या काही दिवसांपासून पवारांनी भूमिका बदलल्यामुळं राज्यात पुन्हा सत्ताबदल होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादी भाजपसोबत युती करणार असल्याचं बोललं जात असतानाच आता खुद्द शरद पवारांनी याबाबतचं स्पष्टीकरण दिलं आहे. भाजप आणि राष्ट्रवादीची युती होणार की नाही याबाबत “मला माहिती नाही”, असं म्हणत शरद पवारांनी युतीबाबतचा सस्पेन्स आणखी वाढवला आहे.
गौतम अदानी प्रकरणावर शरद पवारांनी भाजपशी सुसंगत भूमिका घेतल्यानंतरच अजित पवार काही तासांसाठी नॉट रिचेबल झाले होते असे बोलले जात आहे. त्यानंतर शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधत भाजप आणि राष्ट्रवादीच्या युतीवर ‘मला माहिती नाही’, असं म्हणत तीन शब्दांत विषय संपवला आहे. पवारांच्या वक्तव्यामुळं कोणतंच स्पष्टीकरण वाढलेलं नसून राष्ट्रवादी-भाजपच्या युतीबाबचा सस्पेन्स आणखी वाढला आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिल्लीत विरोधकांची बैठक बोलावली होती. त्याला काँग्रेस नेते राहुल गांधी, बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी हजेरी लावली होती. परंतु त्या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित नव्हते. त्यामुळं आता पवार काँग्रेसची साथ सोडून भाजपचा हात धरणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.