( अहमदाबाद )
गुजरात टायटन्स संघाने पंजाब किंग्ज विरुद्धचा सामना ६ विकेट्सने जिंकला, हा या मोसमातील त्यांचा तिसरा विजय आहे. गुजरातसाठी शुभमन गिलने महत्त्वाची भूमिका बजावली. शुभमन गिलच्या दमदार अर्धशतकाच्या बळावर गुजरात टायटन्सने पंजाबचा सहा विकेटने पराभव केला. अखेरच्या षटकात गुजरातला विजयासाठी सात धावांची गरज होती. पण सॅम करन याने भेदक मारा करत जम बसलेल्या शुभमन गिल याला बाद करत सामना रंगतदार अवस्थेत नेला. पण राहुल तेवतियाने चौकार मारत गुजरातला विजय मिळवून दिला. पंजाबने दिलेले १५४ धावांचे आव्हान गुजरातने सहा विकेट आणि एक चेंडू राखून पार केले. १५४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातच्या शुभमन गिलने शानदार अर्धशतकी खेळी केली. या सामन्यात गुजरात संघाने १९.५ षटकांत लक्ष्य गाठले.
पंजाबने दिलेल्या १५४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातने दमदार सुरुवात केली. शुभमन गिल आणि वृद्धीमान साहा यांनी पावरप्लेमध्ये चौकार अन् षटकारांचा पाऊस पाडत सामना एकाकी झुकवला. वृद्धीमान साहा याला ३० धावांवर बाद करत रबाडाने पंजाबला पहिले यश मिळवून दिले. साहाने १९ चेंडूत पाच चौकारांच्या मदतीने ३० धावांची खेळी केली. रबाडाची आयपीएलमधील ही शंभरावी विकेट ठरली. ६४ डावात त्याने १०० विकेट घेण्याचा पराक्रम केला.
साहा बाद झाल्यानंतर शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी गुजरातचा डाव सावरला. दोघांनी संयमी फलंदाजी करत धावसंख्या हालती ठेवली. पण अर्शदीप सिंह याने साई सुदर्शनला बाद करत रंगत वाढवली. साई सुदर्शन याने २० चेंडूत १९ धावांचे योगदान दिले. यामध्ये दोन चौकारांचा समावेश होता. साई सुदर्शन बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्याही लगेच तंबूत परतला. त्याला फक्त आठ धावा करता आल्या. त्यासाठी हार्दिकने ११ चेंडूचा सामना केला. हार्दिक बाद झाल्यानंतर शुभमन गिल आणि डेविड मिलर यांनी डाव सांभाळला. सामना गुजरातच्या बाजूने झुकला असे वाटत असतानाच सॅम करन याने अखेरच्या षटकात गिलला बाद केले. शुभमन गिल याने ४९ चेंडूत ६७ धावांची खेळी केली. या खेळीत गिल याने सात चौकार आणि एक षटकार लगावला. डेविड वॉर्नर आणि राहुल तेवतिया यांनी गुजरातला विजय मिळवून दिला. डेविड मिलर याने १८ चेंडूत १७ धावांचे योगदान दिले तर राहुल तेवतिया याने दोन चेंडूत पाच दावा केल्या.
तत्पूर्वी गुजरातच्या भेदक गोलंदाजीसमोर पंजाबने निर्धारित २० षटकात आठ विकेटच्या मोबदल्यात १५३ धावांपर्यंत मजल मारली. पंजाबच्या एकाही फलंदाजाला अर्धशतकी खेळी करता आली नाही. पंजाबचा कर्णधार शिखर धवनही स्वस्तात बाद झाला. गुजरातच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा करत पंजाबच्या फलंदाजांना ठराविक अंताराने तंबूत पाठवले. मॅथ्यू शॉर्ट याने पंजाबकडून सर्वाधिक धावांची खेळी केली. शॉर्ट याने २४ चेंडूत ३६ धावांचे योगदान दिले तर शाहरुख खान याने ९ चेंडूत २२ धावा ठोकत पंजाबला सन्मानजक धावसंख्या उभारुन दिली.
पंजाबच्या फलंदाजांना आज विशेष कामगिरी करता आली नाही. कर्णधार शिखर धवन, भानुका राजपाक्षे हे काही खास करू शकले नाहीत. पंजाबकडून मॅथ्यू शॉर्टने सर्वाधिक ३६ धावा केल्या. त्याच्याशिवाय मधल्या फळीतील फलंदाजांनीही उपयुक्त योगदान दिले. गुजरातकडून मोहित शर्माने दोन बळी घेतले. त्याचवेळी इतर सर्व गोलंदाजांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.