(मुंबई)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील बंडखोर आमदारांच्या याचिकेवर सुनावणी पूर्ण होऊन सुप्रीम कोर्टाचा निकाल येणे बाकी आहे. आता त्यातच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या निवडणुकीवरून राज्यात राजकीय वातावरण तापत असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. शिवसेनेतील ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे हे पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होणं ही अशक्य बाब आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही विधानसभेच्या निवडणुकांना सामोरं जाणार असल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्यामुळं आता यावरून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई तक ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना म्हणाले की, ज्या लोकांनी राज्याच्या सत्तासंघर्षावरील सुप्रीम कोर्टातील सुनावणी पाहिली असेल त्यांना एक बाब लक्षात असेल की, आता उद्धव ठाकरे हे काही पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत, ही अशक्य बाब आहे. कारण त्यांनी बहुमत चाचणीला सामोरं न जाता मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यामुळं आता सुप्रीम कोर्ट त्यांना परत मुख्यमंत्री करू शकत नाही. परंतु सध्या आपण सुप्रीम कोर्टाच्या निकालाबाबत कोणताही अंदाज बांधणं योग्य ठरणार नाही. कोर्टातील निकाल योग्यच लागेच, असा विश्वास आम्हाला आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
राज्याचे एकनाथ शिंदे हेच राज्याचे मुख्यमंत्री राहणार आहेत. आम्ही त्यांच्याच नेतृत्वाखाली लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांना सामोरं जाणार असल्याचं उपमुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे. याशिवाय आमच्या सरकारमध्ये सध्या तरी कोणताही बदल होणार आहे. सरकार स्थिर असल्यामुळं एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहणार असल्याचा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.