(देवरूख /प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यातील हरहुन्नरी पत्रकार व संगमेश्वर न्युज चे सर्वेसर्वा कै. संदेश (मन्या) सप्रे यांचे अकाली दुःखद निधन झाले. कै. संदेश सप्रे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी देवरूखात नगर पंचायत सभागृहात शोकसभा आयोजित करण्यात आली होती. या शोकसभेत उपस्थित मान्यवरांकडून संदेश सप्रे यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. शोकसभेत संदेश सप्रे यांच्या आठवणी जागवत मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली.
संदेश सप्रे हे पत्रकारीतेत त्यांची बातमी लिखाणाची हातोटी वाखणण्याजोगी होती. बातमी ओळखून बातमी निर्भीडपणे भिडणारा पत्रकार अशी त्यांनी आपली ओळख पत्रकारितेच्या माध्यमातून निर्माण केली होती. त्यांच्या लेखणीत फार मोठी ताकद होती. त्यांनी एखादा विषय हाती घेतला तर तो धसास लागेपर्यंत ते त्याचा पाठपुरावा करत तो सोडवित असे. आधुकतेच्या युगात संगमेश्वर न्युज सुरू करून ते सातासमुद्रापार पोहचले. अशा भावना मान्यवरांनी व्यक्त करत संदेश (मन्या) सप्रे यांच्या आठवणींना उजाळा दिला.
संगमेश्वर तालुक्यातील पत्रकार व तालुकावासियांतर्फे कै. संदेश सप्रे यांची शोकसभा आज देवरूख न. पं. सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या शोकसभेत जेष्ठ नागरिक मुकुंद जोशी, बबन बांडागळे , श्रीकृष्ण जागुष्टे देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सू आर्ते, उद्योजक गणेश चाचे, जेष्ठ पत्रकार जे. डी. पराडकर, दिपक भोसले, राजू काकडे हेल्प अँकँडमीचे अध्यक्ष गणेश जंगम, फोटोग्राफर असोसिएशनचे संगमेश्वर तालुकाध्यक्ष सुरेंद्र गीते आदिंनी आपल्या मनोगतातून कै. संदेश सप्रे यांचे पत्रकारितेतील विविध पैलू उलगडले. व मन्याच्या अकाली निधनाने त्यांच्या पश्चात कुटूंबाचे पाठी ठामपणे उभे राहू अशी ग्वाही दिली.
संदेश सप्रे यांचे बंधू जेष्ठ पत्रकार सुरेश सप्रे व समीर सप्रे यांनी आपण आपला भाऊ गमावल्याची भावना व्यक्त करत मन्या सप्रे यांच्या जाण्याने आम्हा सप्रे कुटुंबाची फार मोठी हानी झाली असून ही हानी कधीही भरून न येण्यासारखी आहे. अशा भावना व्यक्त केल्या. शोकसभेला मन्या सप्रे यांचे हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते. शोकसभेचे सूत्रसंचालन पत्रकार सागर मुळ्ये यांनी केले.