(मुंबई)
नुकताच शिवसेना शिंदे गट मंत्री व आमदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्या दौरा केला. प्रभू रामाच्या दर्शनासाठी मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेचे सर्वच आमदार पोहचले होते. त्यामुळे या दौऱ्याला विशेष महत्त्व होते. बाळासाहेबांचा विचार आम्हीच पुढे घेऊन जात असल्याचा दावा सातत्याने शिंदे आणि त्यांचे आमदार करत आहेत. आम्ही कायम हिंदुत्वाच्या विचारधारेवर चालत आहोत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. भविष्यात शिवसेनेतील दोन्ही गट एकत्र येतील का यावरही त्यांनी स्पष्ट शब्दात मत मांडले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, भविष्यात ठाकरे-शिंदे दोन्ही गट एकत्र येण्याची सुतराम शक्यता नाही. आम्ही हिंदुत्ववादी विचारधारेवर पुढे जात आहोत. त्यांची विचारधारा वेगळी आहे. २०१९ मध्ये हिंदुत्वाची समान विचारधारा असणाऱ्या भाजपासोबत आमची नैसर्गिक युती झाली होती. निकालानंतर ही युती तोडून त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार बनवले ज्यांनी राम मंदिर बांधकामालाही विरोध केला होता असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत कोण काम करते आणि संकटाच्या काळात त्यांच्यासोबत कोण उभं राहते हे शिवसैनिकांना माहिती आहे. मूळ शिवसैनिक हा आमच्यासोबत आहे, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केला. तर सुप्रीम कोर्टात सध्या जी सुनावणी झाली. त्याचा निकाल जो काही असेल, तो संविधान आणि लोकशाहीच्या चौकटीत असेल. आम्ही सुप्रीम कोर्टाच्या प्रत्येक निर्णयाचं सन्मान करतो असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.