(मुंबई)
‘रात गई, बात गई’, असं उद्धव ठाकरेंनी मनात आणलं तर युती होऊ शकते, असं वक्तव्य भाजपच्या बड्या नेत्यानं केल्यामुळं चर्चांना उधाण आलं आहे. सत्तांतराला आठ महिने झाल्यानंतर आता भाजपकडून उद्धव ठाकरेंना या ना त्या मार्गे युतीचं आमंत्रण देण्यात येत आहे. विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असताना आता भाजप आणि उद्धव ठाकरेंची युती होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. त्यातच आता भाजपा नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंना युतीचं निमंत्रण देत चर्चांना बळ दिले आहे.
माध्यमांशी बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, जर उद्धव ठाकरेंनी ‘रात गई बात गई’, असं म्हटलं तर आम्ही एकत्र येऊ शकतो. राजकीय आघाड्या करत शरद पवारांनी अनेक नेत्यांची माती केलेली आहे. त्यामुळं ते उद्धव ठाकरेंचीही माती करू शकतात. सध्याच्या काळात घडणाऱ्या राजकीय घटनांमुळं मी व्यथित आहे. त्यामुळं हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा भाजपसोबत यायला हवं, असं वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अद्यापही चर्चेचे दरवाजे बंद केलेले नाहीत, उद्धव ठाकरेंनी ‘रात गई बात गई’, असं म्हटलं तर त्यांच्यासोबत भाजपची युती होऊ शकते, असंही चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या ‘फडतूस’ टीकेवर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मन फार मोठं आहे, परंतु त्यांना काहीही बोललं जात असेल तर ते आम्ही सहन करणार नाही. आम्ही कुणाला त्रास देणार नाही आणि कुणी दिला तर त्याला सोडणार नाही, असा इशारा चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे. राजकारणात लवचिकता फार महत्त्वाची असते. लवचिकता स्वीकारली नाही तर पक्षासह समाजाचा काहीही फायदा होत नाही. त्यामुळं आम्ही उद्धव ठाकरेंना जे बोललो ते मनापासून बोललेलो नाही, असंही चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.