(रत्नागिरी)
शहरातील परकार रुग्णालयासमोरील दुचाकीला धडक देणाऱ्या कारचालकाला न्यायालयाने ५ हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. संजय विष्णू पाटील असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. कारच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जण जखमी झाले होते. शहर पोलिसांनी संजय (५०, रा. साळवी स्टॉप रत्नागिरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून न्यायालयापुढे दोषारोपपत्र ठेवले होते.
रत्नागिरी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पल्लवी शेषगिरी गोवेकर यांनी या खटल्याचा निकाल दिला. सरकारी पक्षाच्यावतीने अॅड. प्रज्ञा तिवरेकर यांनी काम पाहिले. खटल्यातील माहितीनुसार १३ ऑक्टोबर २०१९ रोजी अमोल शिंदे हे मित्र अमोल आरवट यांना दुचाकी (एमाट्च ०८ एबी ६२७२) वर मागे बसवून साळवी स्टॉप वरून माळनाका येथे जात होते. दुपारी ३ च्या सुमारास परकार रुग्णालयासमोरील संजय पाटील यांच्या ताब्यातील कार (एमएच ०१ बीजी ५५३५) ने अमोल यांच्या दुचाकीला धडक दिली.
या अपघातात दुचाकीवरील, अमोल मिळाजी शिंदे (२९, रा. रिगीवाडी) व अमोल बापुराव आरवट हे जखमी झाले. या अपघात प्रकरणी अमोल यांनी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार शहर पोलिसांनी संजय पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. शहर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार कोकरे यांनी न्यायालयापुढे दोषारोपपत्र ठेवले होते. न्यायालयापुढे पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार दुर्गा सावंत यांनी काम पाहिले.