(किल्ले रायगड / चंद्रकांत कोकणे)
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४३ व्या पुण्यतिथीनिमित्त किल्ले रायगडावर हजारो शिवभक्तांनी महाराजांना अभिवादन केले. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ व स्थानिक उत्सव समिती, महाड यांच्या वतीने श्री शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन गडावर करण्यात आले होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त किल्ले रायगडावर दि. ५ व ६ एप्रिल असे दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिवसमाधी आणि जगदीश्वर मंदिर दीपवंदना, पुरस्कारप्राप्त मान्यवरांच्या मुलाखती (राजसभेत), शाहिर किरणसिंग सुरज राऊळ , जळगाव यांचा “ही रात्र शाहिरांची” हा शाहिरी कार्यक्रम, तसेच श्री जगदिश्वर मंदिरात “हरिजागर” असे कार्यक्रम झाले. आज गुरुवार दि. ६ एप्रिल रोजी पहाटे श्री जगदिश्वर पूजा, श्री हनुमान जन्मोत्सव, आणि त्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे विधीवत पूजन, त्याचबरोबर राजदरबार येथे श्री शिवप्रतिमा पूजन करण्यात आले.
यावेळी ना. मंगल प्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केल्यामुळेच दिवसेंदिवस महाराजांची कीर्ती जगभरात वाढतच असल्याचे प्रतिपादन केले, त्यामुळे राज्यातील गडकिल्ले संवर्धनासाठी शासन प्रयत्नशील असून रायगड किल्ल्याच्या परिसरात होत असलेल्या शिवसृष्टी सारख्या प्रकल्पांना शासन निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. त्याचप्रमाणे अफजलखान वधाची प्रतिकृती प्रतापगडावर उभी केली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले
आमदार भरतशेट गोगावले यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आमची मंदिरे वाचली. मात्र आज अनेक जण वेगवेगळ्या मंदिरामध्ये जातात, मात्र गडावर महाराजांच्या पुण्यतिथीला येण्यास त्यांचे पाय अडकतात अशी भावना व्यक्त करून छत्रपती शिवरायांचा विसर होता कामा नये, त्यामुळे जन्माला येऊन एकदा तरी रायगडावर आले पाहिजे असे गोगावले म्हणाले.
यावेळी सैन्यदल अधिकारी आणि सरदार घराणे शुर सरदार हरजी राजे महाडिक यांचा शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि स्थानिक उत्सव समितीच्या माध्यमातून विशेष सन्मान करण्यात आला. तसेच मराठ्यांच्या समाधी स्थळांचे अभ्यासक प्रवीण भोसले यांना यावर्षीचा श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. शिवरायमुद्रा स्मरणिका प्रकाशन देखील यावेळी करण्यात आले.
अभिवादन सभेनंतर श्री शिवप्रतिमेची सर्वांचे ढोल ताशाच्या गजरात पालखी मिरवणूक काढण्यात आली.
राजदरबार ते श्री शिवसमाधी स्थळापर्यंत काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये पारंपारिक वेशभूषा करून महिला व शिवभक्त सहभागी झाले होते, त्यानंतर श्री शिछत्रपतींना मानवंदना देण्यात आली. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष रघूजीराजे आंग्रे, सरकार्यवाहक पांडूरंग बलकवडे, कार्यवाह सुधीर थोरात आणि स्थानिक उत्सव समिती, महाडचे अध्यक्ष त्रिंबक पुरोहित, कार्यवाह संतोष कदम आदींनी विशेष मेहनत घेतली.