(नवी दिल्ली)
बँक खात्यात अनेकजण आपला पैसा जमा करतात. काही वेळा विविध कारणांनी एकापेक्षा अधिक बँक खाती सुरू केली जातात. मात्र, कालांतराने या बँक खात्याकडे खातेदाराचे दुर्लक्ष होते. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी अशाच बेवारस खात्यातील रक्कम रिझर्व्ह बँकेकडे सोपवली आहे. जवळपास ३५ हजार कोटींची रक्कम आरबीआयकडे सुपूर्द करण्यात आली.
केंद्रीय अर्थमंत्रालयाने मागील आठवड्यात संसदेला ही माहिती दिली. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी फेब्रुवारी महिन्यात रिझर्व्ह बँकेला ३५ हजार १२ कोटींची रक्कम सुपूर्द केली. या रक्कमेला कोणताही वारस नव्हता. केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी लोकसभेत लिखित उत्तरात माहिती दिली. सर्वाधिक बेवारस संपत्ती ही भारतीय स्टेट बँकेतील आहे. एसबीआयमध्ये ८०८६ कोटी रुपयांची संपत्ती बेवारसपणे होती तर पंजाब नॅशनल बँकेत ५३४० कोटी रुपये, कॅनरा बँकेजवळ ४५५८ कोटी रुपये जमा होते. त्यावर कोणाचाही दावा नव्हता. ही सर्व रक्कम आरबीआयकडे सुपूर्द करण्यात आली.
१० वर्षांनंतर ठरते अनक्लेम्ड अमाऊंट
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार बचत अथवा चालू खात्यातील रकमेवर जर १० वर्षापर्यंत कोणीही दावा केला नसेल तर ती रक्कम अनक्लेम्ड अमाऊंट म्हणून गणली जाते. या पैशांना आरबीआयने स्थापन केलेल्या डिपॉझिटर एज्युकेशन अॅण्ड अवेअरनेस फंड मध्ये हस्तांतरीत केले जाते.
बँक खाते ठेवा अपडेट
जर तुम्हीदेखील बँक खात्यात पैसे जमा करत असाल तर खात्यात व्यवहार सुरू ठेवले पाहिजे. जर तुम्ही एका निश्चित कालावधीसाठी या खात्यात व्यवहार करत नसाल तर हे खाते निष्क्रिय केले जाते. या निष्क्रिय खात्यातील रक्कम अनक्लेम्ड अमाउंट म्हणून गणली जाते. त्यामुळे ग्राहकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.