(खेड)
खेड नगरपरिषदेत अंदाधुंद कारभार सुरू असून नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत येथील शिवसेनेचे शहरप्रमुख कुंदन सातपुते यांच्या नेतृत्वाखाली खेड नगरपरिषदेवर धडक देत जाब विचारण्यात आला. यावेळी येथील मनमानी कारभाराचा पाढा वाचत येत्या आठ दिवसात कारभारात सुधारणा न झाल्यास नागरिकांसमवेत आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे
खेड नगरपरिषदेतील मनमानी कारभाराचा शहरातील नागरिकांना फटका बसत आहे. वर्षभरापूर्वी नागरिकांनी तक्रारी करून देखील समस्यांची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने अद्याप कुठलीच कार्यवाही करण्यात आलेली नाही. शहरात कमी दाबाच्या पाणी समस्याने डोके वर काढले आहे. याबाबत तक्रारी करून देखील नगर प्रशासन दखलच घेत नसल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे
आठवड्यातील पहिल्याच दिवशी मुख्याधिकारी हर्षदा राणे सोमवारी दुपारपर्यंत कार्यालयात हजर नव्हत्या. ही बाबदेखील शिवसेना कार्यकर्त्यांनी समोर आणली. यावेळी प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. याप्रसंगी माजी नगरसेवक सतीश चिकणे, स्वप्नील सैतवडेकर, बॉबी खेडेकर, दिनेश पुजारी, प्रेमळ चिखले, तुषार सापटे आदी उपस्थित होते.