(संगमेश्वर /प्रतिनिधी)
संगमेश्वर येथील संगीत विशारद असलेली युवा गायिका निहाली अभय गद्रे हिने मंगळवारी संगमेश्वर येथील पैसा फंड इंग्लिश स्कूल येथील कलादालनाला सदिच्छा भेट दिली. येथील कलाकृती पाहून निहाली एवढी भारावून गेली की, या गायिकेच्या गळ्यातून अचानक सुरेल सुर उमटू लागले आणि सारे वातावरण प्रसन्न झाले .
कलादालनातील कलाकृती पहात असताना निहाली या रंग, रेषा आकारात एवढी तल्लीन झाली की, रंग – रेषांच्या कलाकारांजवळ एका अनामिक नात्याने तिचे मन एकरुप झाले आणि आपोआप तिच्या गळयातून सुरेल सुर बाहेर पडले आणि जणू छोटेखानी मैफलच संपन्न झाली. निहाली सोबत ओम अभय गद्रे आणि पुणे येथील निहालीची बहिण मिहिका प्रशांत भागवत हे देखील उपस्थित होते. पैसा फंडच्या कलाविभागातर्फे सर्वांचे स्वागत करण्यात आले.
कलाकृती पाहिल्यानंतर आपल्याला कलाकाराची मेहनत दिसून आली. शास्त्रीय संगीतात आम्ही जसा रियाज करत असतो तसाच रंग – रेषांचा कलाकार आपल्या कलेवर प्रभुत्व मिळविण्यासाठी जीवतोड मेहनत घेत असतो. कलाकारांच्या या मेहनतीला दाद देण्यासाठीच आपल्याला येथे गावेसे वाटले असे निहालीने नमूद केले.