रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरीवासीयांची हक्काची रत्नागिरी-दादर-रत्नागिरी पॅसेंजर गाडी त्वरित सुरू करावी, अशी मागणी करणारे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक उपेंद्र शेंड्ये यांना देण्यात आले.
मनसेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष जितेंद्र माधवराव चव्हाण, तालुका अध्यक्ष महेंद्र नागवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेचे शहर उपाध्यक्ष अमोल अर्जुन श्रीनाथ यांनी हे निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, ऐतिहासिक वास्तूंचा वारसा, सांस्कृतिक वारसा, दळणवळणाची साधने, पर्यटन हे कोकणाचे वैशिष्ट्य आहे. कोकण रेल्वे हासुद्धा कोकणाचा मानबिंदू असून तो कोकणातील जनतेच्या अस्मितेचा ठसा आहे. या मार्गावर सर्वांत प्रथम सुरू झालेली रत्नागिरी-दादर-रत्नागिरी पॅसेंजर गाडी गेल्या वर्षी करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून बंद आहे. सुरुवातीला या गाडीचा मार्ग दादर ते रत्नागिरी आणि रत्नागिरी ते दादर असा होता. पण खेदजनक बाब म्हणजे या गाडीचा मार्ग वाढवून ती गाडी थेट मडगावपर्यंत करण्यात आली. त्यामुळे ती रत्नागिरीकरांची एकमेव हक्काची गाडी राहिली नाही. ही गाडी दादर-रत्नागिरी मार्गावर ५०१०३ या क्रमांकाने, तर पुढे रत्नागिरी ते मडगाव मार्गावर ५०१०१ या क्रमांकाने धावते. परतीच्या प्रवासात मडगाव-रत्नागिरी मार्गावर ५०१०२, तर रत्नागिरी-दादर मार्गावर ५०१०४ या क्रमांकाने धावते. त्यामुळे रत्नागिरीकरांची हक्काची गाडी नाहीशी झाली आहे. त्यामुळे ही गाडी पूर्वीप्रमाणेच दादर रत्नागिरी आणि परत या मार्गावर चालू करावी, असे निवेदनात म्हटले आहे.
आता गणेशोत्सव जवळ येत आहे. हजारो चाकरमानी कोकणात उत्सवासाठी येत असतात. अन्य गाड्यांमध्ये साध्या डब्यांचे आरक्षण मिळत नाही. शिल्लक राहिलेली उच्च श्रेणीची तिकिटे सामान्य कोकणी माणसांना परवडत नाहीत. सध्या कोकण रेल्वेवर गुजरात, दिल्ली, राजस्थान, केरळ, तामिळनाडू, मंगलोर येथून येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्या सुरू आहेत. अशा स्थितीत कोकणातील गाडी बंद का, हा प्रश्न आहे. कोकणाची हक्काची गाडी सुरू व्हावी, अशी आमची मागणी आहे. कोकणवासीयांची मुंबईशी नाळ जोडलेली आहे. पण ती सध्या कापलेल्या स्थितीत आहे. ती पुन्हा जोडावी आणि रत्नागिरी-दादर-रत्नागिरी पॅसेंजर सुरू करावी, असे निवेदनात म्हटले आहे.
गाडी बंद असल्याने या गाडीवर उपजीविका करणाऱ्या अधिकृत मराठी फेरीवाल्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. गाडी सुरू झाली, तर त्यांची उपासमारी दूर होईल. ज्याप्रमाणे राज्याबाहेरून येणाऱ्या रेल्वे गाड्यांचे जनरल डबे करोनामुळे आरक्षित करण्यात आले आहेत, त्याप्रमाणेच दादर रत्नागिरी दादर गाडीचेही सर्व जनरल डबे आरक्षित करावेत, असेही निवेदनात सुचविण्यात आले आहे. ही गाडी लवकरात लवकर चालू झाली नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
विभागीय व्यवस्थापकांना निवेदन देताना मनसे रत्नागिरी शहर उपाध्यक्ष अमोल अर्जुन श्रीनाथ, नाचणे उपविभाग अध्यक्ष तथा कुवरबाव ग्रामपंचायत सदस्य गणेश मांडवकर, मनविसेचे उपतालुकाध्यक्ष अलंकार भोई, राजेश नंदाने, आशीष साळवी आणि इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.