(वेळणेश्वर / उमेश शिंदे)
ग्रामपंचायत अंजनवेलने मक्तेदाराकडून 2 स्कूलबस तत्काळ ताब्यात घ्यावा व शाळा व्यवस्थापन समितीकडे चालविण्यासाठी द्याव्यात. असा तोडगा गुहागर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत राऊत यांनी सूचवला. हा तोडगा आंदोलनकर्ते ग्रामस्थ, अंजनवेल ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि मक्तेदाराने मान्य केला. 29 मार्चच्या ग्रामसभेने या तडजोडीला मान्यता दिली. त्यामुळे अखेर अंजनवेल ग्रामस्थांनी 29 तारखेला सायंकाळी उपोषण मागे घेतले.
अंजनवेल गावातील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी जिल्हा परिषद आदर्श आंतरराष्ट्रीय शाळेच्या मालकीच्या 3 स्कूलबस आहेत. या स्कूलबस तीन वर्षांच्या कराराने चालवण्यासाठी साई टूर ॲण्ड ट्रॅव्हल्स, मार्गताम्हाने यांना देण्यात आल्या होत्या. मात्र ग्रामपंचायत अंजनवेलने मक्त्याचे पैसे न दिल्याने मक्तेदाराने 1 जानेवारी 2023 पासून स्कुलबस चालविणे बंद केले तसेच तीन्ही स्कुलबस आपल्या ताब्यात ठेवल्या. या स्कुलबसचे पैसे ग्रामपंचायत अंजनवेलने द्यावेत, स्कुलबस पुन्हा सुरु व्हाव्यात यासाठी माजी सरपंच यशवंत बाईत, आत्माराम मोरे, माजी उपसरपंच विजय मिशाळ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमेश पुंडलीक यांनी फेब्रुवारी 2023 पासून प्रयत्न केले. मात्र त्याला ग्रामपंचायत अंजनवेल आणि पंचायत समितीकडून प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे 13 मार्च 2023 पासून ग्रामपंचायत अंजनवेल समोर ग्रामस्थांनी आंदोलन सुरु केले. 10 दिवस आंदोलन झाले तरी प्रशासन हालचाल करत नसल्याने ग्रामस्थांनी हे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा 25 मार्चला दिला होता.
या इशाऱ्यानंतर 27 मार्चला सहाय्यक गटविकास अधिकारी केळसकर आणि विस्तार अधिकारी कांबळे यांनी ग्रामस्थ व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांशी स्वतंत्रपणे चर्चा केली. 28 मार्चला गटविकास अधिकारी प्रशांत राऊत यांनी अंजनवेल ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामविकास अधिकारी, मक्तेदार साई टूरचे मालक अजीत साळवी आणि आंदोलनकर्ते ग्रामस्थ यांच्याजवळ चर्चा केली. या चर्चेनंतर पुन्हा संयुक्त बैठक राऊत यांनी घेतली.
यामध्ये ग्रामपंचायतीने अजीत साळवी यांच्याकडून 2 स्कुलबस तत्काळ ताब्यात घेवून त्या शाळा व्यवस्थापन समितीच्या ताब्यात द्याव्यात. शाळा व्यवस्थापन समितीने या स्कुल बस चालवाव्यात. ग्रामपंचायतीने मक्तेदाराला भाड्यापोटी देणे असलेल्या रक्कमेचा हिशोब 15 दिवसांत करावा. देय रक्कम मक्तेदाराला किती महिन्यात देणार त्याचा कालावधी निश्चित करावा. देय रक्कमेसाठी माजी सरपंच यशवंत बाईत आणि आत्माराम मोरे यांनी ग्रामपंचायत अंजनवेलबरोबर संयुक्तरित्या प्रयत्न करावे. असा तोडगा सर्वानुमते मान्य करण्यात आला. तडजोडीचे हे मुद्दे 29 मार्च च्या ग्रामसभेत ठेवून त्याला ग्रामसभेची मंजूरी घ्यावी. हे सर्व मुद्दे सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, सर्व ग्रामपंचायत सदस्य, मक्तेदार आणि आंदोलनकर्ते यांनी मान्य केले. 29 मार्चला अंजनवेलच्या ग्रामसभेत तडजोडीच्या सर्व मुद्द्यांना ग्रामस्थांनी एकमताने मंजूरी दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन थांबवले.