(रत्नागिरी)
रत्नागिरी- हातखंबा मार्गावरील चाँदसूर्या येथे कार-दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. विष्णू माईंगडे (३३, रा. भोके रत्नागिरी) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी कारचालकाविरूद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
अथर्व दत्ताराम गांगण (२०, रा. चांदेराई, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कारचालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ मार्च रोजी रात्री ११.३० च्या सुमारास अथर्व गांगण स्वीफ्ट डिझायर कार (एमएच- ४६-एबी- ४८४९) घेऊन भरधाव वेगाने हातखंबा ते रत्नागिरी असा येत होता. तर त्याच सुमारास विष्णू माईंगडे व राजेश लिंगायत हे अॅक्टिव्हा (एमएच ०८ एके-१८९४) घेऊन रत्नागिरी ते हातखंबा असे जात होते. ही दोन्ही वाहने चाँदसूर्या येथे आली असता अथर्वचा कारवरील ताबा सुटला व त्याने समोरुन येणाऱ्या दुचाकीला धडक देत अपघात झाला. यात विष्णू व राजेश हे दोघेही जखमी झाले होते. उपचारादरम्यान विष्णू यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी पोलिसांनी अथर्वविरूद्ध गुन्हा दाखल केला.