(मुंबई)
देशभर गाजलेल्या अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी आता नवी माहिती समोर आली आहे. या दोन्ही प्रकरणात नेपाळ कनेक्शन असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणातील तीन आरोपींची चौकशी करण्याकरिता नेपाळला जाण्याची एनआयएला परवानगी देण्यात आली आहे.
अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी संतोष शेलार, सतीश मोठुकुरी आणि मनीष सोनी यांची सखोल चौकशी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. २५ फेब्रुवारी २०२१ रोजी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलिया निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली एसयूव्ही सापडली होती. त्यानंतर या प्रकरणात मुख्य आरोपी सचिन वाझेसह नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या दोन्ही प्रकरणांचा तपास एनआयए करत आहे.
२५ फेब्रुवारी २०२१ रोजी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या २० कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली एक स्कॉर्पिओ गाडी बेवारसपणे सोडण्यात आली होती. नंतर या गाडीचा मालक मनसुख हिरेन याची हत्या करण्यात आली होती. त्यांचा मृतदेह ५ मार्च २०२१ ला मुंब्य्राजवळील खाडीत सापडला होता. त्यानंतर मनसुख हिरेन याची हत्या सचिन वाझेंनीच केल्याचा आरोप त्याच्या कुटुबियांकडून करण्यात आला होता. हा तपास एटीएसकडून राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडे देण्यात आला. या प्रकरणात मुख्य आरोपी सचिन वाझे, प्रदीप शर्मासह इतर आरोपींना अटक करण्यात आली आहे.
अँटिलिया तसेच आणि मनसूख हिरेन प्रकरणाला अंतिम स्वरुप देण्यासाठी बडतर्फ पोलीस निरीक्षक सचिन वाझेने वसुल केलेल्या पैशांचा वापर करण्यात आल्याचे एनआयएने आपल्या चार्जशीटमध्ये नोंद केली आहे. अँटिलिया प्रकरणानंतरच परमबीर सिंह यांच्यावर १०० कोटी रुपये वसूल करण्याचा आदेश दिल्याचा आरोप करण्यात आला होता. ही वसुली सचिन वाझे करत असल्याचे सांगितले गेले.