(निवोशी /गुहागर : उदय दणदणे)
गुहागर तालुक्यातील अनेक दिव्यांग व्यक्ती एकत्र येत दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी “गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्था” या सेवाभावी संस्थेची स्थापना करून दिव्यांग व्यक्तींना त्यांचे समृद्ध जीवन जगण्यासाठी उपरोक्त संस्था गेली २० वर्षे अविरत कार्यरत असून नुकतच २५ मार्च २०२३ रोजी संस्थेचा २१ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
२१ व्या वर्धापनदिनानिमित्त संस्थेच्या वतीने संस्थेच्या वाटचालीत योगदान देणाऱ्या तसेच समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला, त्यात गुहागर तालुक्यातील वेळंब गावचे कर्तव्य दक्ष पोलीस पाटील स्वप्नील तुकाराम बारगोडे यांना “दिव्यांग मित्र पुरस्कार २०२३” ने सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
स्वप्नील बारगोडे हे गेली १० वर्षे पोलीस पाटील पदावर कार्यरत असून पंचक्रोशीत त्यांचे समाजकार्य फार मोठे आहे.
स्वप्नील बारगोडे यांनी आजवर वेळंब सहित मळण, पांगारी तर्फे वेळंब,पोमेंडी, निवोशी, जामसूत, पालपेणे,कौंढर आदी गावांमध्ये “संजय गांधी निराधार योजना व राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना” लोकांपर्यंत पोहचवून त्याचा प्रत्यक्षात त्यांना लाभ मिळवून दिला, २० पेक्षा अधिक लोकांना शिवाय ४७ विधवा महिलांना शासकीय योजनेतून पेंशन सुरू करून दिली आहे. त्याचबरोबर रत्नागिरी सिव्हिल रुग्णालयात जाऊन १६ दिव्यांगाना नियमानुसार अपंगत्व सर्टिफिकेट मिळण्यासाठी मदत केली आहे. तर ५ अपंगांना पंचायत समितीच्या माध्यमातून घरघंटी प्राप्त करून दिल्या आहेत, जवळ जवळ ५८ महिलांना त्यांनी प्रधानमंत्री उज्वला योजनेतून गॅस वाटप केले आहे. त्याचप्रमाणे “कोविड१९” च्या महामारीत मृत्यू पावलेल्या पतीच्या वारस पत्नीला एकूण ६ महिलांना त्यानी पन्नास हजार रुपये शासकीय स्तरावरील मदत मिळवून दिली. तर राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतून २२ विधवा महिलांना वीस हजार रुपये प्राप्त करून दिले आहे.
महिला व बालकल्याण विभाग -पंचायत समितीच्या माध्यमातून ७ गरजू महिलांना शिलाई मशीन मिळवून देण्या कामी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. त्याचबरोबर वेळंब गावातील गणपत बाब्या घाडे यांचे मोडकळीस आलेले घर ग्रामस्थांना आवाहन करून लोकसहभाग वर्गणीतून एकूण अडीच लाख रुपये इतके खर्च करून सन २०२० मध्ये त्यांना नवीन घर बांधून देण्यात स्वप्नील बारगोडे यांचे फार मोठे योगदान आहे. ग्रामस्थांना शासकीय योजनांची माहिती त्याच बरोबर गावात विविध सामाजिक उपक्रम राबवून गावच्या सर्वांगीण विकासासाठी स्वप्नील बारगोडे नेहमी सक्रिय सहभाग घेत असतात, आणि म्हणूनच अशा सेवाभावी सामाजिक कार्यकर्त्याची दखल घेत “गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्था” ता.गुहागर जि.रत्नागिरी, यांच्या वतीने पोलीस पाटील -स्वप्नील बारगोडे यांना “दिव्यांग मित्र पुरस्कार-२०२३” ने गौरविण्यात आले.
सदर पुरस्कारासाठी माझ्या कार्याची दखल घेऊन पुरस्कारासाठी मला पात्र समजून “दिव्यांग मित्र पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल उपरोक्त संस्थेचे स्वप्नील बारगोडे यांनी आभार मानले आहेत, पोलीस पाटील स्वप्नील बारगोडे यांना दिव्यांग मित्र पुरस्कार -२०२३ प्राप्त झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक व अभिनंदनासह शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.