(मालेगाव)
सत्तासंघर्षानंतर ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी प्रथमच मालेगावात सभा घेतली. एमएसजी महाविद्यालयाच्या मैदानावर ही सभा पार पडली. ठाकरेंच्या सभेसाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती. या शिवगर्जना मेळाव्यातून ठाकरे यांनी शिंदे गटातील सुहास कांदेंचा समाचार घेतला. तर यावेळी ठाकरे यांनी राहुल गांधी यांनाही ठणकावलं.
उद्धव ठाकरे म्हणाले की, ही लढाई लोकशीहीची लढाई आहे. कन्याकुमारीपासून कश्मीरपर्यंत आम्ही राहुल गांधी यांच्यासोबत होतो. मात्र स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमचे दैवत आहे, आम्ही आमच्या देवतांचा अपमान सहन करणार नाही. स्वातंत्र्यवीरांनी १५ व्य़ा वर्षी स्वातंत्र्यांची शपथ घेतली होती. आपण लोकशाहीसाठी एकत्र आलो आहोत. त्यामुळे आता यात वेगळे फाटे फोडू नका, अंदमानमध्ये त्यांनी १४ वर्षे मरण यातना सोसल्या आहेत. ते येरागबाळ्याचे काम नाही असे राहुल आपण यांना सांगत आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
सुहास कांदे यांच नाव न घेता उद्धव ठाकरे यांनी तुफान टीका केली. एका कांद्याला खोक्यांचा भाव मिळत असेल तर कांदे उत्पादक शेतकऱ्यांना किती मिळाले पाहिजेत, असे म्हणत त्यांना शिंदे गटातील आमदार सुहास कांदे यांचा समाचार घेतला. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील टोले लगावले. शिवधनुष्य गद्दारांना अधिक काळ पेलणार नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
शिंदे गटावर टीका करताना उद्धव म्हणाले की, तुम्ही काय मिळवले, माझ्यावरती व शिवसेनेवर प्रेम करणारा एकही माणूस तुम्ही बरोबर नेऊ शकला नाही. याउलट तुम्ही तुमच्या कपाळावर गद्दार असा कायमस्वरुपी शिक्का मारून घेतला. हा शिक्का तुमच्या कपाळावर आयुष्यभर राहणार आहे. निवडणूक आयोगाचे गांडूळ झाले आहे. आयोगाला मोतीबिंदू झालेला नसेल, तर त्यांनी आधी खेडची आणि आता मालेगावची सभा पाहावी. आयोगाने जे-जे मागितलं, ते सगळं दिलं. तरीदेखील त्यांनी आपल्यावर अन्याय केला. ही पुढे असलेलीच “शिवसेना” होय, मी यालाच शिवसेना म्हणणार कारण ही माझ्या वडिलांनी स्थापन केली आहे, मिंध्याच्या वडिलांनी नाही. ज्यांना स्वतःच्या वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते, त्यांना बोलण्याचा अधिकार नाही असे ठाकरे पुढे म्हणाले.
तुमचा नेता म्हणजे माझा भारत देश असं मुळीच नाही, माझा देश इतका शुद्र नाही. मोदींवर टीका केली तर भारताचा अपमान नाही, मोदी म्हणजे भारत हे कुणाला मान्य आहे का? यांच्यासाठी क्रांतीकारी फासावर गेले, आपले रक्त सांडले आहे का, तुमच्या कुटुंबावर बोललं तर लगेच पोलिसांची कारवाई करतात, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावलं आहे.