(मुंबई)
स्टार विदेशी अष्टपैलू बेन स्टोक्स आणि मोईन अली चेन्नईत आल्याने आनंदी झालेल्या CSK चाहत्यांना आता मात्र मोठा धक्का बसणार आहे. चेन्नई सुपर किंग्जचा युवा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरी आगामी इंडियन प्रीमियर लीगमधून बाहेर पडू शकतो, असे समजते. तसेच लखनऊ सुपर जायंट्सचा मोहसीन खान देखील आयपीएल २०२३ मधून बाहेर जाऊ शकतो.
हे युवा खेळाडू आयपीएलच्या पुढील हंगामापूर्वी दुखापतींशी झुंज देत असले तरीही ते आपापल्या फ्रँचायझींच्या सतत संपर्कात आहेत आणि संघासोबत सरावही करत आहेत. दोघांना तंदुरुस्त होण्यासाठी वेळ लागेल, अशा स्थितीत ३१ मार्चपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेत त्यांच्या खेळण्याबाबत साशंकता आहे. मुकेश पाठीच्या दुखापतीने त्रस्त असून सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये त्याचे पुनर्वसन सुरू आहे. दुसरीकडे मोहसीन लखनऊ संघासोबत सराव करत आहे पण संपूर्ण हंगामात तो प्लेइंग इलेव्हनच्या बाहेर वेळ घालवेल, अशी शक्यता आहे.