(रत्नागिरी / प्रतिनिधी)
उन्हाळा सुरू झाल्यामुळे आता गृहिणीची आगोटची तयारी सुरू झाली आहे. त्यात प्राधान्याने वर्षभर पुरेल इतका लाल मसाला तयार करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे बाजारात आता मसाल्यासाठी मिरच्यांची मागणी वाढली आहे. मात्र यावर्षी मिरचीचे उत्पादन कमी झाल्याने बाजारात मसाल्यासाठी लागणाऱ्या लाल मिरच्या कमी प्रमाणात दिसत आहेत.
दुसरीकडे या मिरच्यांची मागणी वाढल्याने, त्यांच्या दरात वाढ झाली आहे. मसाल्याचा रंग खुलवणारी काश्मिरी मिरची आणि मसाल्याची चव वाढवणारी संकेश्वरी मिरची तर बाजारात अगदी कमी प्रमाणात उपलब्ध आहे. परिणामी बाजारातील मिरच्यांचे दर ३० ते ४० ट्यांनी वधारले आहेत. त्यामुळे यावर्षी साठवणुकीचा मसाला करताना महिलांना आपला हात आखडता घ्यावा लागणार आहे. सध्या बाजारात १५ दिवसाला अवघ्या १ ते २ गाड्या मिरची बाजारात येत असल्याची माहिती मिरची व्यापाऱ्यांनी दिली.
गरम मसाल्याचे दर मात्र स्थिरच
संपूर्ण हंगामात बाजारात मसाल्याच्या ४०० ते ५०० पोती मिरच्या बाजारात येतात. एका पोत्यात ४० ते ५० किलो मिरची असते. मसाल्यासाठी मुख्यतः बेडगी, तेजा, संकेश्वरी, काश्मिरी या मिरच्या लागतात. त्यांच्याबरोबर अख्खा गरम मसालाही लागतो. या अख्ख्या गरम मसाल्याचे दर स्थिर आहेत. मात्र मसाल्यात मुख्य घटक मिरची हाच असतो. तीच महागल्याने मसाला कसा बनवणार हा प्रश्न आहे.