(दापोली / प्रतिनिधी)
उज्ज्वला गॅस कनेक्शनची माहिती देऊन आपण उज्ज्वला गॅस योजनेचे कनेक्शन देण्याकरिता आलेलो आहोत, असे खोटे सांगून दापोली तालुक्यातील अनेकांना लुटणाऱ्या टोळीचा दाभोळ पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने नुकताच पर्दाफाश केला. शिवाय या प्रकरणी ६ जणांना अटक केली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शनिवारी दापोली तालुक्यातील उसगाव गणेशवाडी येथे एक टोळके गॅस कनेक्शन देतो सांगून ग्रामस्थांकडून ५०० रुपये उकळत होते. पैसे दिल्यानंतर यासंबंधीचे वृत्त कळताच गावातील लोकांनी आजूबाजूच्या परिसरात या टोळक्याला शोधण्यास सुरुवात केली. त्यांचा शोध घेत असता पंचनदी येथील तारेचा खांब येथे एका स्कॉर्पिओमध्ये संगीता पवळे नांदेड, सुनीता बादावत- चंद्रपूर, ममता डोंगरे – अकोला, अशोक जोगदंड-बीड, शामसुंदर जोंजाळ – बीड, विठ्ठल सलगर – बीड आदी ६ व्यक्ती बसलेल्या आढळून आल्या. त्यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता आपण पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेची खोटी माहिती देत असल्याचे व लोकांकडून पैसे लबाडीने घेत असल्याचे त्यांनी कबूल केले.
यानुसार दाभोळ पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास दाभोळ सागरी पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षक पूजा हिरेमठ करत आहेत.