( मुंबई )
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी आपण व नारायण राणे यांनी पक्ष का सोडला? हे पहिल्यांदाच उलघडून सांगितले. हे सांगताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती आरोप केले. नारायण राणे हे शिवसेनेमध्ये निष्ठेने काम करत होते, ते सोडून गेलेच नसते असे ते यावेळी म्हणाले.
राज ठाकरे म्हणाले की, नाराज असलेले नारायण राणे हे शिवसेना सोडून गेले याला तशीच काही करणेही आहेत. याबाबत मी बाळासाहेबांना म्हटले होते की, त्यांना जाऊ देऊ नका, आपलं नुकसान होईल. त्यावर बाळासाहेब म्हणाले की, राणेंना घेऊन मला भेटायला ये. मी नारायण राणेंना फोन करून सांगितल्याबरोबर लगेच ते निघाले. मात्र पुन्हा मला बाळासाहेबांचा फोन आला व ते म्हणाले की, राणेंना बोलावू नको. त्यावेळी मला त्यांच्यामागे कोणीतरी बोलत असल्याचा आवाज आला. त्यानंतर पुन्हा मला राणेंना फोन करून सांगावे लागले की, येऊ नका. त्यावेळी ज्याप्रकारे पक्षात राजकारण सुरू होतं, ज्या प्रकारे तळमळीने काम करणाऱ्या लोकांचा वापर करून घालवलं जात होतं. त्यामुळे पक्षाचा शेवट निश्चित होता. याचा भागीदार व्हायचं नव्हतं म्हणून मीही बाहेर पडलो.
माझा आधीही शिवसेनेतील विठ्ठलाविषयी तक्रार नव्हती. मात्र त्यांच्याभोवती जे बडवे होते, त्यांच्याविषयी होती. तेच एकदिवस पक्षाला संपवतील असे वाटलं होतं आणि तसेच झाले. शिवसेनेतून बाहेर पडल्यावर बाळासाहेबांच्या समोर नवा पक्ष काढण्याची माझी हिंमत नव्हती. कोण साथ देणार, कशी साथ देणार. अशा सगळ्या परिस्थितीत अनेक लोक माझ्याकडे आली आणि त्यांनी मला महाराष्ट्र फिरायचा सल्ला दिला.
उद्धववर आरोप करताना राज म्हणाले की, पक्षात असताना मला दाबण्याचा प्रयत्न झाला, माझे फोटो बॅनरवर छापले जात नव्हते. एकेदिवशी मी उद्धवला गाडी घेऊन बाहेर गेलो. हॉटेल ऑबेरायला गेलो, मी त्याला समोर बसवलं. मी हे जे सांगतोय, छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन सांगतोय. त्याला म्हटलं बोल तुला काय हवं आहे, तुला पक्षाचं अध्यक्ष व्हायचं. उद्या सत्ता आली तर मुख्यमंत्री व्हायचं आहे, तर तो हो म्हणाला, तुला जे व्हायचं ते हो, मला सांग माझं काम काय आहे, मला फक्त प्रचाराला बाहेर काढू नका. मी प्रचार केल्यानंतर निवडून आलेल्या लोकांना जबाबदारी द्यायची नाही. मग पुढच्या वेळी प्रचाराला कुठल्या तोंडाने जायचं? असा सवाल उद्धव ठाकरेंना विचारल्याचंही राज ठाकरे यांनी सांगितलं.
‘मला काही अडचण नाही, आपलं ठरलं, आता नक्की ना. आम्ही घरी आलो. बाळासाहेब झोपलेले होते. त्यांना सांगितलं, सर्व प्रॉब्लेम सोडवला. सगळं मिटलं आहे. मला त्यांनी मिठ्ठी मारली. तिथे कुणी म्हात्रे होते, त्यांनी उद्धव ठाकरेंना बोलवायला सांगितलं. परत आम्ही शोधलं ते कुठे तरी बाहेर निघून गेले होते. हे सगळं मला बाहेर जाण्यासाठी प्रयत्न सुरू होते’, असा आरोप राज ठाकरे यांनी केला.
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला. वसेनेचे चिन्ह म्हणजे शिवधनुष्य आहे, ते त्यांना झेपेल का, अशी शंका व्यक्त करीत शिंदे यांच्या नेतृत्वाबद्दलही शंका उपस्थित केली. भाजपशी जवळीक साधणाऱ्या राज ठाकरे यांनी भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झालेल्या शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. राज ठाकरे यांनी भाजपबद्दल एक अवाक्षरही काढले नाही. त्यामुळे याचे वेगवेगळे तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.
मुख्यमंत्र्यांवर टीका करताना राज ठाकरे म्हणाले की, माझं एकनाथ शिंदेंना सांगणं आहे की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, तुम्ही जनतेची कामं करा. महाराष्ट्रासमोर अनेक प्रश्न आहेत, त्याकडे लक्ष द्या. त्यांच्या (उद्धव) मागे सभा घेत बसू नका. त्यांनी वरळीत सभा घेतली, की शिंदेनी वरळीत सभा घेतली. उद्धवने खेडमध्ये सभा घेतली की यांनीही खेडमध्ये जाऊन घेतली सभा. हे आता थांबवा. सुशोभीकरणाच्या नावाखाली पैशाची उधळपट्टी थांबवा. आज बेरोजगारी वाढत आहे, शेतकरी अडचणीत आहेत. ह्या प्रश्नांसाठी जनता सरकारकडे बघत आहे आणि सरकार कोर्टाकडे बघतंय. असं सरकार मी नाही पहिल्यांदाच पाहतोय, अशी उपहासात्मक टीका त्यांनी यावेळी केली.