(मुंबई)
कोकणच्या हापूसला जगभरातून मोठी मागणी असते; परंतु दरवर्षी कर्नाटकी आंबा आणि हापूस भेसळ करून विकला जात असल्याने हापूसच्या दरावर मोठा परिणाम होतो. यंदाही मुंबई, पुण्यासारख्या मेट्रोसिटीमध्ये हापूसच्या नावाखाली कर्नाटक आंब्याची सर्रास विक्री सुरू झाली आहे. सध्या कर्नाटकी आंब्याची वाशी मार्केटमध्ये आवक वाढल्याने रत्नागिरी हापूसचे दर घसरले आहेत. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका आंब्याला बसल्याने यंदा उत्पादन कमी कमी आहे. अत्यंत कडक उन्हाळा आणि काही राज्यांत झालेला अवकाळी पाऊस यामुळे यंदा आंब्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या बागायतदारांना झालेला खर्च तरी बाहेर पडेल याची चिंता आहे, तर “कर्नाटकी” मुळे दराबाबतही मोठे आव्हान निर्माण झाले आहे. दरवर्षी प्रमाणे कर्नाटकी आंब्याने कोकणातील आंबा बागायदारांचे टेन्शन वाढवले आहे.
कोकणचा राजा समजल्या जाणाऱ्या हापूसच्या कोवळ्या फळांचीही मोठ्या प्रमाणात गळ झाली आहे. त्यामुळे यंदा ३५ ते ४० टके फळेच हाती लागण्याची शक्यता आंबा उत्पादक यांनी व्यक्त केली. यावर्षी आंबा सर्वसाधारणपणे कमी प्रमाणात व उशिरा दाखल झाला आहे. आंबा उत्पादकांनी आपला आंबा थेट बाजारात घेऊन विक्रीसाठी घेऊन येत आहे. झाडावरून तोडल्यानंतर थेट खोक्यात भरून चार-सहा पाच डझनच्या पेट्या भरून आगाऊ मागणी नुसार आंबा पोच करण्यात येत आहे मात्र मार्केटमध्ये रत्नागिरीसह कर्नाटकी आंबा थेट पुणे, वाशी आदी भागातून येत असल्याने अस्सल हापूसच्या नावाखाली इतर आंब्याची विक्री होत असल्याने ग्राहकांची फसगत होत आहे.
कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा तसेच आजूबाजूच्या परिसरातील हापूस आंब्याला जीओग्राफिकल इंडिकेशन टॅगची (GI टॅग) मोहर उठली आहे. यामुळे हापूसचं मूळ कोकणच असल्याचं व तिथे पिकणारा हापूस हाच खरा हापूस असल्यावरही शिक्कामोर्तब झालं आहे. GI टॅग असो वा नसो या भागातील आमचा हाच खरा हापूस म्हणून खूप पूर्वीपासून आंबा प्रेमींकडून कधीच ही मान्यता मिळाली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर या ५ जिल्ह्यांतील हापूस आंबा उत्पादकांनी भौगोलिक निर्देशांक मिळवला आहे. त्यामुळे या ५ जिल्ह्यांतील हापूस आंबा उत्पादकांनाच “हापूस” हा शब्द वापरून आंबा विक्री करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. परंतु प्रत्यक्षात बाजारातील चित्र पाहिले, तर कोणताही आंबा हापूस म्हणून विक्री केला जात आहे. हापूस आंबा उत्पादन होण्यापूर्वी “रत्नागिरी/ देवगड हापूस” अशी अक्षरे असलेले पुठ्याचे ही सहज मिळत असल्याने कर्नाटक आणि इतर राज्यांतील कमी प्रतीचा आंबा या बॉक्समध्ये टाकून राजरोसपणे हापूसच्या दराने विक्री केली जाते. गेल्या काही वर्षांपासून हे चित्र दिसून येते. परंतु संबंधितांवर कोणतीही कारवाई होत नाही, ही कोकांवासियांची शोकांतिका आहे.
रत्नागिरी हापूसच्या नावाखाली कर्नाटकी हापूससह इतर ठिकाणच्या आंब्याची विक्री होत असल्याने आंबाप्रेमींची फसवणूक होत आहे. नेमका आंबा कसा ओळखावा, याची माहिती नसल्याने अनेकजणांची फसगत होत आहे. त्यामुळे सर्व सामान्य ग्राहकांनी आंबा खरेदी करताना फरक ओळखणे गरजेचे आहे, फसवणूक झाल्यास ग्राहक पंचायतच्या माध्यमातून दाद मागणे आता क्रमप्राप्त बनले आहे.
बॉक्स पाहूनच फसगत…
बॉक्स रत्नागिरी आंब्याचा. त्यावर रत्नागिरी हापूस असे मराठी भाषेत मोठ्या अक्षरात नाव देखील लिहिलेले असते. मात्र आतमधील आंबा हा रत्नागिरी मधूनच आलेला असेल याची खात्री मात्र नाही. अगदी पायरी आंबा देखील रत्नागिरी हापूस आंब्याच्या बॉक्समध्ये ठेवून विक्री केले जात असून ज्यांना आंब्याची माहिती आहे, अशांकडून आंब्याची विचारणा केली जाते. मात्र ज्यांना आंब्याबद्दल फारसे माहिती नाही अशांची फसगत होत आहे. बाजारपेठेत इतर भागातील खासकरून कर्नाटक आणि आंध्रा राज्यातील आंबे हापूस आंबे म्हणून विकले सर्रास विकले जात आहेत. विक्रेत्यांमध्ये उत्तर भारतीय विक्रेत्यांचा समावेश जास्त असतो. आपल्याकडील आंबा “हापूस” आंबाच आहे असे बोलून तो विकला जातो. यामुळे मूळ हापूस आंब्याच्या उत्पाद्कांवर अन्याय होतो, तर ग्राहकांची पण फसवणूक होते.
असा ओळखा अस्सल हापूस
बाजारभाव – बाजारात आंबे खरेदीसाठी जाताना हापूस आंब्याचा सध्याचा दर काढा. त्यासाठी सोशल माध्यमाचा उपयोग केला जाऊ शकतो. फेसबुक आणि व्हाटसअँप वर अनेक विक्रते हापूस आंबे विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्या दरांपेक्षा जर बाजारातील विक्रेता खूपच कमी किमतीत विकत असेल तर तो हापूस आंबाच आहे का याची खात्री जरूर करा
सुगंध – चांगल्या गुणवत्तेच्या हापूस आंब्याला एक नैसर्गिक सुंगध असतो. त्या सुंगधामुळे तो दूरवरुनही पटकन ओळखता येतो. नैसर्गिकरित्या गवताच्या अढीमध्ये पिकवलेल्या आंब्याच्या घमघमाट दूरपर्यंत पसरतो. इतर भागातून येणारे आंबे जे हापूस आंब्यासारखे दिसतात. मात्र त्याला अजिबात गंध नसतो किंवा फार क्वचित येतो. कर्नाटक हापूसला म्हणावा तितका सुगंध येत नाही पण रत्नागिरी आणि देवगड हापूसचा घमघमाट सुटतो.
साल – रत्नागिरी किंवा देवगड हापूस आंबा ओळखण्याची सर्वात पहिली आणि सोपी चाचणी म्हणजे या आंब्याचे साल कर्नाटकी हापूस आंब्याच्या तुलनेत पातळ असते. कर्नाटक हापूसचे साल काही प्रमाणात जाड असते. त्यामुळे दोन्हीतील फरक ओळखायचा हा एक महत्त्वाचा मुद्दा असू शकतो. पिकलेल्या हापूस आंब्याची साल आपण सहजरित्या हाताने काढू शकतो. तसेच या सालीला आंब्याचा गर लागत नाही.
देठ – अस्सल हापूस आंब्याचा देठ खोल असतो. हापूस आंब्याचा वास आणि त्याचा केशरी गर यावरून सहजरित्या ओळखू शकतो. ड्युपलिकेट हापूस आतून पिवळ्या रंगाचा असतो. कर्नाटक हापूस आंबा कापल्यानंतर पिवळट दिसतो तर देवगड आणि रत्नागिरी हापूस कापल्यानंतर गडद केशरी रंगाचे दिसतात.
रंग – फळाच्या रंगाकडे लक्षपूर्वक बघितलं तरीही प्रमुख फरक जाणवू शकतो. जर आंबा कृत्रिमरित्या पिकवला असेल तर तो पिवळाधमक आणि एकाच रंगाचा वाटतो. कर्नाटक हापूस आंबा पिवळसर आणि खालच्या बाजूला हिरव्या रंगाचा असतो तर देवगड किंवा रत्नागिरी हापूस आंबा तोंडाशी केशरी किंवा लालसर असतो आणि खालच्या बाजूला पिवळसर असतो.
आकार – नैसर्गिकरित्या पिकलेला अस्सल हापूस आंबा हा खालच्या टोकाशीसुद्धा गोलाकार आणि वजनदार असतो. कर्नाटक हापूस आंब्याचा आकार काहीसा उभट असतो तर रत्नागिरी किंव देवगड हापूस गोलाकार असतो. त्यामुळे साधारण आकारावरुनही आपल्याला या आंब्याची पारख करता येते.
शिवाय जर आपली नजर चांगली असेल तर आंब्याच्या पेटीतील वर्तमानपत्रातूनही त्याची ओळख स्पष्ट होते. त्यात कुठले वर्तमानपत्र वापरले आहे त्यावरून सुद्धा तो आंबा कुठल्या भागातून आला आहे हे कळते. तरीही खात्री केलेली बरी, यातही फसवणूक असू शकते.
कर्नाटकी हापूस हा बाजारात खूप लवकर दाखल होतो आणि तो उशीरापर्यंत असतो. तर रत्नागिरी किंवा देवगड हापूस आंबा साधारणपणे १५ एप्रिल ते ३१ मे याच कालावधीत बाजारात मिळतो. त्यामुळे या कालावधीच्या आधी बाजारात येणारे आंबे साधारणपणे कर्नाटकी हापूस असण्याची शक्यता जास्त असते.
रत्नागिरी किंवा देवगडचा हापूस आंबा काही दिवसांनंतर सुरकुततो. मात्र कर्नाटक हापूस आंबा तसाच कडक राहतो. तसच कर्नाटक हापूस आंब्याचे साल काहीसे चमकदार असते, तर रत्नागिरी आणि देवगडच्या आंब्याच्या सालाला कोणत्याही प्रकारची चकाकी नसते.
कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात मुंबईत दाखल होणारा आंबा हा आता कोकणातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांची डोकेदुखी ठरत आहे. गेल्या काही वर्षांत कर्नाटकातील अनेक व्यापाऱ्यांनी कोकणातून हापूसची रोपे नेऊन तेथील अनेक भागांमध्ये त्याची लागवड केली. त्यामुळे आता कर्नाटकातून राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (एपीएमीसी) येणाऱ्या आंब्याचे प्रमाण वाढत आहे. वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये जितका आंबा कोकणातून येतो, तितकेच प्रमाण हे कर्नाटकातून येणाऱ्या आंब्याचे आहे.
हे दोन्ही आंबे दिसायला सारखेच असले तरी त्यांच्या चव, सुगंध, दर्जामध्ये इतकेच नव्हे तर आंब्याच्या सालीमध्येही फरक असतो, तेव्हा आपल्या आंबा हापूसच आहे की नाही ते अवश्य पारखून घ्या.