(लांजा)
मुंबई गोवा महामार्गाचे गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेले काम कासव गतीने चालू आहे. त्यामुळे लांजा तालुक्यातील जनता गेले चार ते पाच वर्ष खड्डे व धुळीचा त्रास सहन करत आहे. चांगला रस्ता मिळेल या अपेक्षेने जनता सर्व त्रास सहन करत असली तरी आता डोक्यावरून पाणी गेले आहे. लांजा तहसीलदार प्रमोद कदम यांना निवेदन देवून मुंबई गोवा महामार्गाची लवकरात लवकर दुरुस्ती करुन लांजा वासियांना सुखकर प्रवास करण्याची संधी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष बाबा धावणे यांनी केली.
आम्ही गेले चार वर्षे प्रत्येक पावसाळ्यात खड्डयांविषयी प्रशासनास निवेदन, आंदोलन करून जागे करत आहोत. परंतु प्रशासनाने फक्त थुंकी लावण्याचे काम केले आहे. परंतु सध्याच्या कामाची गती पाहता सर्व काम पुर्ण होईल असे दिसून येत नाही. तरी जे काम पुर्ण होणार नाही, तो रस्ता BBM, Carpet, व Sealcoat करून संपूर्ण रस्ता ३० एप्रिलपर्यंत मजबुतीकरण न केल्यास आम्ही महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे २०२३ रोजी लांजा तहसीलदार दालनासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
महामार्ग अधिकाऱ्यांना सूचना देवून लांजा तालुक्यातील महामार्गाचे काम न केल्यास राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष बाबा धावणे, वक्ता सेल जिल्हाध्यक्ष सचिन जाधव व दाजी गडहिरे हे १ मे पासून लांजा तहसीलदार दालना समोर आमरण उपोषणाला बसणार आहेत. यावेळी या बाबतचे निवेदन सादर करताना तालुकाध्यक्ष अभिजित राजेशिर्के, खजिनदार संजय खानविलकर, युवक तालुकाध्यक्ष बाबा धावणे, प्रविण जेधे व दाजी गडहिरे उपस्थित होते.