(खेड)
दोन आठवडय़ांपूर्वी खेडमध्ये झालेल्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेला प्रत्युत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (१९ मार्च )रोजी शहरातील उद्धव ठाकरेंनी घेतली त्याच मैदानावर सभा आयोजित करण्यात आली होती. तर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी, विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी नव्हे, तर विकासाच्या गोष्टी करण्यासाठी ही सभा होणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले होते. मात्र शिंदे गट शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी खेड परिसरात ‘करारा जवाब मिलेगा’, ‘विरोधकांच्या पोटात नुसती आग, मैदानात उतरला ढाण्या वाघ,’ असा मजकूर लिहिलेले बॅनर लावले होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा जंगी होणार असा अंदाज सर्वांनी बांधला होता. आणि त्या अंदाजाप्रमाणेच या सभेला खेडात जनसागर लोटला होता.
मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी हिंदुत्वाला डाग लावण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं. आम्ही तो डाग पुसण्याचं काम केलं आहे. आपल्यासोबत बाळासाहेबांचा आशीर्वाद आहे, त्यामुळेच निवडणूक आयोगाने आपल्याला शिवसेनेचे नाव आणि चिन्ह दिलं. सत्तेसाठी त्यांनी एका मिनिटात भूमिका बदलली. म्हणून आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. सत्ता येते, सत्ता जाते, पण नाव गेलं की परत मिळवता येत नाही, असं बाळासाहेब ठाकरे म्हणायचे. शिवसेनेला डाग लावण्याचा प्रयत्न झाला, तो मला लागू द्यायचा नाही, अशी काळजी आता आपल्याला करायची आहे. गद्दारी आम्ही केली नाही, तर गद्दारी 2019 ला झाली, असं मुख्यमंत्री म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “हिंदुत्वाचं राजकारण केलं, ही चूक झाली, असं उद्धव ठाकरेंनी विधानसभेत सांगितलं. तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांना चुकीचं ठरवलं. ज्यांनी बॉम्बस्फोट घडवले, त्यांना साथ देणारे, त्यांच्याशी व्यवहार करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही कसे बसू शकता? हीच हिंदुत्वाशी गद्दारी आहे, बेईमानी आहे” बाळासाहेबांनी ज्यांना नेहमी दूर ठेवलं, त्यांच्या वाऱ्यालाही आपण उभे राहायला नको, अशा लोकांना तुम्ही जवळ करणार”? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.
शिवसेनेत आम्ही उठाव केल्यानंतर आनंदराव अडसूळ, गजानन किर्तीकर यांनी आमच्या निर्णयाला पाठिंबा दिला. त्यामुळं आता आपण सर्वजण मिळून महाराष्ट्राच्या आणि कोकणच्या विकासासाठी काम करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात ठाकरे गटाचे जागोजागी सर्कशीप्रमाणे शो होणार आहेत. तिथेही तेच टोमणे, खोके आणि गद्दार या शब्दांव्यतिरिक्त त्यांच्याकडे काहीच नाहीये, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. मतदारांनी शिवसेना-भाजपा युतीला मतदान केलं होतं. परंतु उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली. शिवसेनेवरील तोच डाग आम्ही पुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं निवडणूक आयोगानं शिवसेनेचं नाव आणि चिन्ह आपल्याला दिलंय, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
आम्ही तुमचे काय घोडे मारले – रामदास कदम
खेडमधील सभेत बोलताना शिंदे गटाचे नेते रामदास कदम म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि भास्कर जाधव यांनी आमच्या सभेत किती गर्दी आहे, हे लपून का होईना पाहायला हवं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसऱ्याच्या सभेला लाखो लोक होती. त्यामुळं शिवसेना कुणाची हे त्याच दिवशी ठरलं होतं. २००९ साली मी दापोलीतून तिकीट मागितलं पण गुहागरमधून तिकीट देण्यात आलं. उद्धव ठाकरेंनी मला तिथं धोका देऊन, गाफील ठेवून पराभूत केल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला आहे. मातोश्रीसाठी आम्ही अनेक लोकांना अंगावर घेतलं. त्यामुळं आम्ही तुमचे काय घोडे मारलेत?, याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यायला हवं. असंही रामदास कदम यांनी म्हटलं आहे.
कोकणातील नेत्यांना बाजूला सारून अनिल परब यांना रत्नागिरी जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं. परब यांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेचे २० आमदार सूरतला गेले. त्यावेळी गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरेंना राष्ट्रवादीची साथ सोडण्यास सांगितलं. परंतु त्यांनी गुलाबरावांना मातोश्रीवरून हाकलून लावल्याचा आरोपही रामदास कदमांनी केला आहे. भास्कर जाधवांसारखे गद्दार आणि बेईमान लोकांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे आमच्यावर चाल करून येत असल्याचा आरोपही कदमांनी केला आहे.
कोकणात काजू-आंबा प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी ४ वर्षांसाठी १३७५ कोटींची तरतूद केली आहे. सिंधुदुर्गात मालवण-वेंगुर्ल्यात मार्केटिंग आणि ब्रँडिंगला आपण प्रोत्साहन देतोय. चक्रीवादळ आल्यानंतर विद्युत पोल, ओव्हरहेड लाईन तुटून पडतात त्यासाठी मदत-पुनर्वसनमधून २ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मच्छिमार बांधवांना दिलासा देण्यासाठी सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. काही देश पर्यटनावर चालतात. ज्या ज्या ठिकाणी रस्त्यांचं काम प्रलंबित आहे, तिथे मे पर्यंत एक लाईन आणि संपूर्ण रस्ता डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले असल्याचे तसेच मंडणगडला एमआयडीसी करण्याचा निर्णय घेतला जाईल. तिथेही लोकांना रोजगार मिळेल. एमएमआरडीएच्या धर्तीवर कोकणासाठी मोठं प्राधिकरण करण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.
योगेश कदमांना राजकीय दृष्ट्या कसं संपवायचं हे षडयंत्र ज्या बैठकीत रचलं, त्या बैठकीला मीदेखील होतो. दापोलीच्या निवडणुकीत योगेश कदमांना किती तिकिटं द्यायची, यावर फार मोठी चर्चा झाली. त्यांच्यापेक्षा राष्ट्रवादीला जास्त तिकिटं द्यायची असा अघोषित नियम झाला होता. नंतर योगेश कदमांना काहीच द्यायचं नाही, त्यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस रुजवायची हा निर्णय शिवसेनेच्या नेत्यांनी घेतला होता, असे उदय सामंत म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या सभेआधीच शिंदे गटाला धक्का
आज मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी दापोली नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष प्रशांत पुसाळकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी संजय कदम देखील तेथे उपस्थित होते. प्रशांत पुसाळकर हे मागील काही दिवस योगेश कदम यांच्यासोबत होते. पण आता त्यांनी उद्धव ठाकरे यांना साथ देण्याचं ठरवलं आहे. प्रशांत पुसाळकर यांनी संजय कदम यांच्यासोबत काम करण्याचा घेतलेला निर्णय हा शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. पुसाळकर यांनी सुरूवातीला दापोली काँग्रेसचे युवक अध्यक्षपद भूषवलं आहे. त्यानंतर ते काँग्रेस तालुका कार्यकारणीवर आले. दीड वर्षांपूर्वी झालेल्या दापोली नगरमध्ये निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळाली नसल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढवून काँग्रेसला आव्हान दिलं होत. त्यावेळी ते आमदार योगेश कदम यांच्या जवळचे म्हणून ओळखले जात होते.