(मानसिक संतुलन – भाग १९)
कोणतेही यंत्र जर नीट चालावे असे वाटत असेल तर त्याचे मेक्यानिझम नीट समजून घ्यावे लागते. त्यास कसे हाताळायचे याविषयी शिस्त पाळावी लागते. अन्यथा ती वस्तू लवकर खराब होईल हे सांगायला नको. ती वस्तू सजीव असो अथवा निर्जीव! हा नियम केवळ वस्तुलाच नाही तर जीवसृष्टीतील सर्व घटकांना व घटनांना लागू आहे. अगदी आपल्या जीवनालाही! आपले जीवन हे शिस्तबद्धच असायला हवे. निसर्गातील प्रत्येक घटकाला शिस्त आहे. सूर्य रोज पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. नित्यनेमाने वारे वाहतात पाऊस येतो, थंडी येते, उन्हाळा पावसाळा हिवाळा हे ऋतू न चुकता येत राहतात. आपल्या पूर्ण जीवनावर याचा परिणाम होत असतो. म्हणून आपले जीवनही शिस्तबद्ध असायला हवे. पतंजली हे असे एक ऋषी होऊन गेले की ज्यांनी शिस्तीला अतिशय महत्त्व दिले. ही शिस्तबद्धता आपल्या जीवनात किती महत्त्वाची आहे हे समजावून सांगितले. निव्वळ सांगून किंवा ऐकून जीवनामध्ये शिस्त आणता येत नाही. त्यासाठी एका विशिष्ट पद्धतीने ती आत्मसात करावी लागते. पतंजलीने सांगितलेला अष्टांग योग हा अशाच शिस्तबद्ध पद्धतीने जीवन जगण्यास शिकवतो. योगिक पद्धत ही जीवन जगण्याची सुंदर पद्धत आहे. या पद्धतीने आपण आपले जीवन अत्यंत सुंदर व संतुलित बनवू शकतो. परंतू दुर्दैव हे की अशा पद्धतीने जीवन शिक्षण आपल्याला लहानपणापासून मिळत नाही. त्यामुळे इतक्या सुंदर जीवनपद्धती पासून आपण वंचित राहतो.
आपल्या जीवनात अनेक घटना घडत असतात. या घटना घडण्यामागे काही कारणे असतात. आपल्या हातून जी कर्मे घडतात त्याचे ते परिणाम असतात. ह्या बऱ्यावाईट कर्माची फळे भविष्यात आपल्या वाट्याला येतात. आपल्या संबंधित ज्या काही घटना घडतात किंवा जे काही प्रसंग वाट्याला येतात ते दुसरे तिसरे काही नसून आपल्या कर्माचीच फळे होत. कर्मफळे संपली की जीवन संपते आपल्याला मुक्ती मिळते. मागील दोन लेखांमध्ये आपण जीवन मुक्ती मिळवण्यासाठी बाह्य आणि अंतर्गत घटकांचे कसे आचरण करावे हे पहिले आहे. आजच्या लेखात शरीर आणि मनास निरोगी ठेवणारी अष्टांग योगातील तिसरी पायरी म्हणजेच आसन बघू.
बऱ्याच लोकांना योग हा कठीण मार्ग वाटतो. रोज सकाळी नियमित उठावे, सर्वांगाला पिळ द्यावा; हे सर्व नकोसे वाटते. त्यापेक्षा निवांत उठावे, खावे प्यावे मजा करावी; हे बरे वाटते. परंतु पतंजलींच्या मते जीवनात जर नियमितता नसेल, शिस्त नसेल तर माणसाचं जीवन आनंदी बनू शकत नाही. भौतिक घटकांतुन मिळणारे सुख हे तेवढ्या वेळेपुरते वाटते खरे, परंतु ती भविष्यातील दुःखाची नांदी असते. म्हणून आळस न करता आपली जी नैमित्तिक कर्मे असतात ती करावी. योग शिकल्याने अशी शिस्त चांगल्या पद्धतीने अंगी बाणते. ही शिस्त कशी असावी हे सांगण्यासाठी पतंजलींनी अष्टांग योगाची रचना केली. त्यातील आसन ही एक पायरी आहे. नियमित योगासने केल्याने आपले शरीर व मन सुदृढ बनते. अलीकडे योगाचा खूपच बोलबाला झाला असला तरी वास्तव योग अजून खूप दूर आहे. बऱ्याच वेळा योगासनांनाच लोक योग समजतात. विविध प्रकारची योगासने, शुद्धीक्रिया व थोडे श्वसनाचे व्यायाम यायला लागले की मला योग आला अशी लोकांची समज होते. परंतू योग शिकणे इतके सोपे नाही. बारा बारा वर्षे तपस्या केलेली ऋषिमंडळी आपण ऐकतो. म्हणजेच योग कमी कालावधीत शिकण्याचा प्रकार नाही. हे सारे ध्यानात घेऊन “द योग इन्स्टिट्युट सांताक्रुझ” चे संस्थापक श्री योगेंद्रजी यांनी, “एक सामान्य गृहस्थी” योग कसा शिकू शकेल याचा शंभर वर्षापूर्वी विचार केला. आणि आपल्या पुरातन योग संस्कृतीचे सुलभीकरण करून खास गृहस्थिंसाठी योगासारखा ज्ञानमार्ग खुला केला. दैनंदिन जीवनात गृहस्थीला येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी योग इन्स्टिट्युट ने अनेक योग तंत्रे व योग संकल्पनांचे सुलभीकरण केले आहे. पतंजलींचा अष्टांग योग त्यासाठी प्रमाण मानला.
नियमित योगासने केल्यास ती शारीरिक पातळीवर त्वरित परीणाम करतात. मनावरही त्यांचा खूप सकारात्मक परिणाम होतांना दिसतो. मानसिक तणावात असलेले अनेक जण आता ऑनलाईन ही योगाचे शिक्षण घेत आहेत. आनंद विहार योगाश्रमाच्या माध्यमातून ऑनलाईन योगाचे वर्ग चालतातच, पण त्याच बरोबर क्लासिकल योगाची ओळख व्हावी म्हणून योगातून आरोग्य हा योगविषयी माहिती देणारा ग्रुपही चालवला जातो. ह्या ग्रुप वरील एका साधकाचा अनुभव तिच्याच शब्दात पहा…
“सरांच्या लेखात एक ओळ आहे चमत्कार! हा विशिष्ठ परिस्थितीचा परिणाम होय। मला स्वतःचा अनुभव सांगायचा आहे. खूप पूर्वी झालेल्या अपघातामुळे मांडी घालता येत नव्हती. त्यामुळे मी योगा तसंच बैठ्याकार्यक्रमाला जाणं सगळं बंद केलं होत. यागोष्टीला एकोणीस वर्ष झाली आहेत आणि सध्या काही अनपेक्षित कारणांमुळे अंतर्मुख झाले आणि पुन्हा एकदा ध्यान योगाची ओढ लागली. ती इतकी मनापासून होती की जणू सर्व सृष्टी मदतीला आली. काहीऔषधं, माझी तीव्र इच्छा सरांचं (योग परिसंवादातून ऑनलाइन) मार्गदर्शन आणि सर्वात महत्त्वाचे ईश्वराची कृपा आणि चमत्कार घडला. मी दहाच दिवसांत मांडी घालायला लागले एकोणीस वर्षानंतर हा चमत्कारच म्हणावा लागेल.
– आपली नम्रसाधना, पुणे.
साधनाताई ऑनलाइन वर्गाला आहेत. सकाळच्या २० मिनिटांच्या ऑनलाइन योग व्याख्यानाने त्यांची मानसिकता बदलली. व त्यांच्यात सकारात्मक बदल झाले.
आपल्या अस्तित्वाची पहिली खूण म्हणजे आपले शरीर! मी आहे ही जाणीव फार सुखद असते. त्यात ते निरोगी असेल तर त्याहून दुसरे सुख नाही. मृत्यूनंतर आपले शरीर आपल्या सोबत रहात नाही. ती अवस्था कशी असेल याची अनुभूती शवासनामध्ये घेता येते. शवासन हे फार सुंदर आसन आहे. “माझे मरण म्या पाहिले डोळा” हे संतांचे वचन म्हणजे शवासन स्थितीच होय. शवासनात वैराग्य भाव आहे. सोडण्यात जो आनंद आहे तो घेण्यात नाही. नियमित योगासनांमधून असे अनेक अनुभव येतात. मन लावून नियमितपणे आसने केल्यास आपल्याला आपली नवीन ओळख होत जाते. सुदृढ शरीरात सुदृढ मन वास करते. शरीरच रोगी असेल तर त्यात येणारे विचारही रोगीच असतील; हे सांगायला नको. रोगग्रस्त शरीर मनातील नकारात्मकता वाढवते. सुदृढ आणि निरोगी शरीरात आत्महत्येचा विचार कधीच येणार नाही. म्हणून प्रथम आपण आपले शरीर निरोगी ठेवले पाहिजे. आपले शरीर निरोगी आणि सुदृढ असावे म्हणून लोकमान्य टिळकांनी एक वर्ष कॉलेजला रामराम ठोकला होता. जीवन एक संघर्ष आहे. त्यासाठी आपले शरीर निरोगी आणि सुदृढच असायला हवे. त्यास आपण पहिले प्राधान्य दिले पाहिजे. स्वतःच्या आरोग्यासाठी लोक खूप कमी वेळ देतात. खर्चही कमी करतात. योग वर्गाला येणारे विद्यार्थी वर्गाची ‘एवढी फी’ म्हणून तोंडात बोटे घालतात. मात्र हॉटेलमध्ये एका वेळचे हजार रुपयाचे बिल अगदी सहजपणे देतात. प्राधान्य कशाला द्यायचे हे आपण ठरवले पाहिजे.
आपल्या आरोग्याबाबत जागृत असणारी काही माणसे नित्यनेमाने व्यायाम करतात. चालायला जातात, जिमला जातात. योग हा सुद्धा एक चांगला आणि परिपूर्ण व्यायाम प्रकार आहे हे आता लोकांना पटू लागले आहे. योगाकडे वळणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही चांगली गोष्ट आहे. योगाच्या बाबतीत भारत हा विश्वगुरू होण्याच्या मार्गावर आहे.
नियमित आसने केल्याने काही विशिष्ट फायदे लगेच दिसून येतात.
• सकाळी लवकर उठायची सवय लागते.
• योगासनाने सर्वांगाला चांगला पिळ बसतो. त्यामुळे स्नायू मजबूत होतात.
• रक्ताभिसरण सुधारते.
• पूर्ण दिवस आनंदी आणि उत्साही जातो.
• कामामध्ये मन लागते व त्यात सुधारणा होते.
• चेहऱ्यावर प्रसन्नता येते. व्यक्तिमत्व सुधारते.
• शरीर निरोगी बनले की मनात आत्मविश्वास निर्माण होतो.
नियमित योगासने केल्याने फायदे इथेच थांबत नाहीत. योगासन करण्याबरोबरच जर यम आणि नियम यांचे पालन केले तर आणखी फायदा होतो.
• नैतिक धैर्य प्राप्त होते.
• आत्मविश्वास वाढतो. प्रत्येक व्यक्तीचा एक पिंड असतो. एक स्वभाव असतो.
• शरीरशुद्धी आणि मन शुद्धी झाली की आपला पिंड लख्ख दिसू लागतो.
• जीवनामध्ये आपल्याला नेमके काय करायचे आहे, (आपला जन्म कशासाठी झाला आहे) याची कल्पना येऊ लागते.
• बाह्य जगातील गोंधळा ऐवजी अंतर जगतात मन रमू लागते.
• शांत आणि संयमी स्वभावामुळे वृत्ती कायमआनंदी बनते. कारण अंतर सुखाचा त्यास शोध लागलेला असतो.
• मन आनंदी होण्यासाठी बाह्य जगातील घटकांची त्यास गरज भासत नाही.
योग शिकण्याची विशिष्ट अशी पद्धत असते. त्यासाठी योग्य व्यक्ती (गुरु) कडूनच योग शिकावा. योगासने करण्याचीही एक पद्धत असते. केवळ व्हिडिओ बघून वेडीवाकडी हालचाल केली म्हणजे ती आसने होत नाहीत. पतंजलीने आसनांची व्याख्या केली आहे. १९५ सुत्रंपैकी फक्त तीनच सूत्रे त्यांनी आसनांसाठी दिली आहेत. पतंजली म्हणतात, “स्थिर सुखम आसनं”. जे माझ्या शरीराला आणि मनाला स्थिर करते सुख देते ते माझे आसन होय. दुसऱ्या सूत्रात पतंजली म्हणतात, “प्रयत्न सैथिल्यानंतसमापत्तीभ्यां” अर्थात मला प्रयत्नांशिवाय अगदी सहज बसता यायला हवे. निव्वळ बसता येणे पुरेसे नाही तर त्या स्थिर अवस्थेत मला स्वतःला त्या अनंत शक्तीशी जोडता यायला हवे. म्हणजे मला आसन जमले असे म्हणता येईल. पुढे तिसऱ्या सूत्रात ते म्हणतात, ” ततो द्वन्द्वानभिघात:” म्हणजे तो आणि मी, तो ईश्वर आणि मी एकरूप आहे. स्थिर बसण्याने हे द्वंद्व नाहीसे होऊन जाते. या दृष्टीने पाहता अलीकडे जे काही योगाचे डेमो किंवा प्रदर्शने दिसतात त्यात योगासने किती योग्य दिशेने जात आहेत याचे चित्र स्पष्ट होते.
कशीही योगासने करून योगाचे वरील लाभ मिळत नसतात. अनेकांना वाटते की योग शिकणे ही सोपी गोष्ट आहे. परंतु हे लक्षात घेतले पाहिजे योग हा ज्ञान मार्ग आहे. आपल्या अवतीभवती काय चालले आहे याची जाणीव योग करून देते. म्हणूनच योगाला चांगले जीवन जगण्याचा सर्वोत्तम मार्ग मानला गेला आहे. सर्व धर्मपंथ संप्रदाय यांच्या मुळाशी योग आहे. सर्वांचे ध्येय एकच आहे ते म्हणजे एकाग्रता साधने! एकाग्रतेने मनुष्याची शक्ती एकटवते. जगात अशी कोणतीही गोष्ट नाही जी मनुष्य एकाग्रतेने साध्य करू शकत नाही. ही एकाग्रता प्राप्त करण्यासाठी पतंजलींनी अष्टांग योगाची रचना केली आहे. पुढील लेखात आपण प्राणायामचे व्यापक स्वरूप समजून घेऊया.
– दिनेश पेडणेकर, योग शिक्षक (मंडणगड)
मोबाईल 9420167413