(रत्नागिरी)
५ मार्चला उद्धव ठाकरे यांनी खेडमध्ये जाहीर सभा घेतली होती. या सभेला उत्तर देण्यासाठी रविवार १९ मार्चला एकनाथ शिंदे यांची त्याच गोळीबार मैदानावर सभा होत आहे. निष्ठावंतांचा एल्गार असे त्याला नाव देण्यात आले आहे. या सभेबाबत बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, लोकशाहीत कोणतेही राजकीय नेते सभा घेतात. पण म्हणून त्याला उत्तर देणारी सभा घेतली जात नाही.
उद्धव ठाकरे यांनी सभा घेतल्यानंतर त्याला उत्तर देण्यासाठी खेड मधील गोळीबार मैदान येथे होणारी मुख्यमंत्री शिंदे यांची उत्तर सभा ही त्यांच्यासाठी राजकीय उत्तरकार्य ठरेल असे उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी म्हटले आहे. रत्नागिरीत विश्रामगृह येथे ते पत्रकारांशी बोलत होते.
आमदार भास्कर जाधव म्हणाले की, रामदास कदम एका पिसाने मोर होतात. त्यांना काही कळत नाही. उद्धव ठाकरे यांनी सभा घेतल्यानंतर त्याला उत्तर देण्यासाठी सभा घेणे हा पोरकटपणा आहे.
रविवार १९ मार्चला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खेड मध्ये गोळीबार मैदानावर सभा होत आहे त्याला उत्तर काय देणार, असा प्रश्न आमदार भास्कर जाधव यांनी विचारला असता त्यांनी का गद्दारी केली त्याचे उत्तर देणार का ? किती खोके घेतले याचे उत्तर देणार का ? असे अनेक प्रश्न भास्कर जाधव यांनी टीकास्त्र डागले.