(मुंबई)
आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप २४० आणि शिंदे गट ४८ जागा लढवणार असल्याचं वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं आहे. त्यानंतर आता त्यांच्या वक्तव्याविरोधात शिंदे गटाच्या आमदारांनी संताप व्यक्त केला आहे. विधानसभेला फक्त ४८ जागा लढवण्यासाठी आम्ही मूर्ख आहोत का?, असा संतप्त सवाल शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. त्यामुळं आता जागावाटपावरून भाजप आणि शिंदे गटात जोरदार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगण्याची शक्यता आहे.
माध्यमांशी बोलताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट बोलताना म्हणाले की, चंद्रशेखर बावनकुळे यांनी अतिउत्साहात ते वक्तव्य केलं आहे. अशा वक्तव्यामुळं युतीत बेबनाव येऊ शकतो, याची जाणीव बावनकुळेंनी ठेवायला हवी. आम्ही फक्त ४८ जागा लढवायला मूर्ख आहोत का?, जागावाटपासाठी वरिष्ठ पातळीवर बैठक होईल. त्यात जो निर्णय होईल तो सर्वांनाच मानावा लागेल. जागावाटपाबाबत बोलण्याचा अधिकार बावनकुळेंना कुणी दिला?, अशा वक्तव्यांमुळं कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल होत असल्याचं सांगत संजय शिरसाट यांनी बावनकुळेंवर जोरदार टीका केली आहे.