( जाकादेवी / संतोष पवार )
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
जिल्हा माहिती कार्यालय रत्नागिरी यांच्या वतीने शासनाच्या जनकल्याणकारी विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी पथनाट्यद्वारा जनजागृती मोहीम राबवण्यात येत असून ही जनजागृती मोहिम सर्वसामान्य नागरिकांसाठी खूपच लाभदायक ठरत आहे.
पथनाट्याच्या माध्यमातून आश्विनी कांबळे आणि पार्टी यांच्यामार्फत सर्वसामान्य जनतेपर्यंत शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती मिळणे शक्य झाले आहे. यामध्ये शासनाच्या विविध योजनांबाबत शेतकरीवर्ग, महिला, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ यांना सविस्तर माहिती देण्यात येते. विशेषत: या जनजागृती पथनाट्यात स्वतः अभिनयकार अश्विनी कांबळे, यांच्या समवेत साक्षी कांबळे, राहुल कांबळे, स्वप्निल धनावडे, श्रेयस माईन, तन्मय राऊत इ. हरहुन्नरी, होतकरू कलाकार सहभागी झाले आहेत.
विविध भागांमध्ये पथनाट्यद्वारा जनजागृती मोहीम राबवत आल्याने या जनजागृती पथनाट्याचे सर्वसामान्य जनतेने मनापासून समाधान व्यक्त केले. या कलापथक प्रमुख कुंंडलिक कांबळे दिग्दर्शित या पथनाट्यामध्ये युवक-युवती यांचा सक्रिय सहभाग असल्यामुळे हे पथनाट्य खूपच परिणामकारक ठरले.
खालगाव येथे झालेल्या मुख्य रस्त्यावर पथनाट्याच्या माध्यमातून सविस्तर उद्बोधन करण्यात आले. यावेळी खालगावचे उपक्रमशील सरपंच श्री. प्रकाश खोल्ये यांनी या पथनाट्याचे स्वागत करून शासनाच्या अद्ययावत विविध योजना पथनाट्यातून अतिशय समर्पक पद्धतीने साकारल्या अशा कलाकारांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या आणि रत्नागिरी माहिती कार्यालयाला मनापासून धन्यवाद दिले. माहिती कार्यालय रत्नागिरी यांच्यावतीने रत्नागिरीसह तालुक्यातील खालगाव, करबुडे, खेडशी, पावस, कर्ला, गोळप, गावखडी, चांदेराई, पाली, नाणीज, चरवेली, कापडगाव इ.मुख्य ठिकाणी जनजागृती मोहीम यशस्वीपणे राबविली जात आहे.
.