(नागपूर )
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर रोजी समृद्धी महामार्गावर नागपूर ते शिर्डी ही बससेवा मोठ्या दिमाखात सुरू करण्यात आली होती. ही बससेवा सर्व साई भक्तांसाठी सोयीची ठरेल व राज्याच्या आर्थिक विकासात गेम चेंजर ठरेल, अशी अपेक्षा होती. मात्र प्रवाश्यांच्या अल्प प्रतिसादामुळे अवघ्या तीन महिन्यात ही एसटी बंद करण्याची नामुष्की महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळावर ओढावली आहे. समृद्धी महामार्गावरून धावणा-या एसटीचा खर्चही प्रवाशांअभावी निघत नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
समृध्दी महामार्गावरून अवघ्या ८ तासांत नागपूर ते शिर्डी असा प्रवास करत साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी जाणा-या साई भक्तांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने मोठ्या अपेक्षेने बस सेवा सुरू केली होती. नागपूरच्या गणेशपेठ आगारातून विना वातानुकुलीत सेमी सिटर कम स्लीपर स्वरुपाची बस सुरू करण्यात आली होती. या बसचे १३०० रुपये तिकीट होते.
उद्घाटनानंतर डिसेंबर महिन्यात ४१ टक्के प्रवासी मिळाले होते तर डिसेंबर महिन्यात एकूण आसन क्षमतेच्या तुलनेत ४०.९८ टक्के प्रवासी मिळाले होते. मात्र, जानेवारी महिन्यात त्यात कमालीची घट होऊन आसन क्षमतेच्या तुलनेत फक्त १३.५१ टक्के प्रवासी मिळाले. फेब्रुवारी महिन्यात हा दर ८.५८ टक्क्यांवर आला आहे. फेब्रुवारी महिन्यात तर अनेक दिवस एकाही प्रवाशाने या बसने प्रवास केला नाही.
त्यामुळेच आता ही बस सेवा बंद ठेवण्याची वेळ एसटीच्या अधिका-यावर आली आहे.