(रत्नागिरी / प्रतिनिधी)
गेले अनेक वर्ष दिव्यांग बांधवांच्या प्रलंबित मागण्या आहेत. दिव्यांगाचे प्रश्न मांडणारी दिव्यांगानी दिव्यांगांसाठी निर्माण केलेली महाराष्ट्रातील सर्वात मोठी व एकमेव संघटना म्हणजे राष्ट्रीय अपंग विकास महासंघ होय. या संघटनेच्या माध्यमातून दिव्यांगांच्या विविध मागण्यांचे निवेदन सोमवारी (१३ मार्च २०२३) रत्नागिरी जिल्हाधिकारी देवेंदर सिंग यांना देण्यात आले.
दिव्यांगांना व्यवसायासाठी मोफत २०० चौरस फूट जागा त्वरीत वितरीत करावी, तुटपुंज्या १००० रुपये पेन्शन ऐवजी ती ४००० रुपये करावी व २५ वर्ष मुलाची अट रद्द करावी, दिव्यांगांना खासदार ते ग्रामपंचायत सदस्यापर्यंत राजकीय आरक्षण द्यावे, जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र पूर्ण क्षमतेने सुरु करुन दिव्यांगांना मोफत कृत्रीम साहित्य त्वरीत द्यावे, जिल्हा, तालुका व ग्रामस्तरावर समाज मंदिराच्या धर्तीवर दिव्यांग भवन बांधावे, प्रत्येक दिव्यांग बांधवाचे अंत्योदय योजनेत नांव समाविष्ट करावे व ३५ किलो धान्य मिळावे, मागणी केलेल्या प्रत्येक दिव्यांग व्यक्तीस विनाअट स्वतंत्र शिधापत्रिका द्यावी, दिव्यांग बचत गट विषयी प्रत्येक गावात पंचायत समितीकडून स्वतंत्र मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करुन दिव्यांगांचे बचत गट तयार करणेविषयी जनजागृती करावी, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी परिपूर्ण असे दिव्यांगांचे प्रशिक्षण केंद्र सुरु करावीत, प्रत्येक ग्राम पंचायतीच्या दर्शनी भागात दिव्यांगांना असणाऱ्या सोयी-सवलतीचे फलक व कोणाला कोणती सवलत दिली यांची माहिती फलक स्वरुपात लावावेत. या मागण्याची अमंलबजावणी प्रशासनामार्फत करावी. अन्यथा दिव्यांग बांधवांसह आमच्या हक्काच्या सोयी सवलतीसाठी आंदोलन किंवा मोर्चा काढण्याचा प्रसंग येऊ नये. अशी विनंती देखील निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष राकेश कांबळे, जिल्हा सचिव नंदकुमार कांबळे, जिल्हा कोषाध्यक्ष राखी कांबळे, जिल्हा संघटक गणपत ताम्हणकर आदी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.