( मुंबई )
राज्य सरकारी कर्मचारी संघाने जुनी निवृत्ती योजना लागू करण्यासाठी उद्या १४ मार्चपासून बेमुदत आंदोलन पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचारी संघटना आपल्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे राज्य सरकारचे टेन्शन वाढणार आहे. दरम्यान, राज्य कर्मचारी आणि शिक्षकांच्या प्रतिनिधींची सोमवारी राज्याच्या मुख्य सचिवांनी तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे राज्याचे लक्ष असणार आहे. १४ मार्चपासून राज्य कर्मचा-यांनी बेमुदत आंदोलन सुरू झाल्यास सरकारची कोंडी होऊ शकते.
जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याची मागणी सातत्याने लावून धरली जात आहे. मात्र, राज्य सरकारने याची दखल घेतली नाही. उलट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना राज्याला परवडणारी नाही. याचा बोजा पडल्यास २०३० पासून राज्याचा आर्थिक डोलारा कोलमडेल, अशी भीती व्यक्त केली. त्यामुळे राज्य कर्मचा-यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत असून, राज्य कर्मचारी संघटना या बेमुदत आंदोलनावर ठाम असून, अगोदरच ठिकठिकाणी आंदोलन करून वातावरण निर्मिती केली जात आहे.
यासोबतच विविध विभागाचे कर्मचारीही या बेमुदत आंदोलनाला पाठिंबा देत असून, आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांनीही काल या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. त्यामुळे आरोग्य विभागाची सेवा कोलमडू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. तसेच राज्य सरकारचे कार्यालये ओस पडल्यास बरेच कामकाज ठप्प होऊ शकते, अशी शक्यताही वर्तवली जात आहे.