(मुंबई)
दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर पुन्हा संकट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे दहावी-बारावीचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्य सरकारी कर्मचा-यांनी येत्या १४ मार्चपासून बेमुदत संपाची हाक दिली आहे. राज्यातील अनेक शिक्षक संघटना या संपात सहभागी होणार असल्याने माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनीही सामील होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तर जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी शिक्षक संघटनांनीही बेमुदत संपाची हाक दिली आहे.
संप काळात उत्तरपत्रिका न तपासण्याचा शिक्षक संघटनांनी पवित्रा घेतला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिक्षक संघटनांच्या संपाचा फटका दहावी बारावीच्या परीक्षा आणि निकालांना बसणार का, अशी भीती व्यक्त केली जात आहे. मागील महिन्यातदेखील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांनी आंदोलन केले होते. बारावी बोर्ड परीक्षेच्या पेपर तपासणीवर आणि कामावर बहिष्कार घातला होता. आताही उद्या १४ मार्चपासून पुन्हा बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. मात्र आता पुन्हा एकदा संपाचे हत्यार उपसल्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीला ब्रेक लागणार आहे. राज्यातील अनेक शिक्षक संघटना या संपात सहभागी झाल्या असून जुनी पेन्शन योजना लागू होईपर्यंत दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय या शिक्षक संघटनांनी घेतला आहे.
संपात सहभागी शिक्षक संघटना
राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ, मुंबई आणि उपनगर माध्यमिक शिक्षक संघ, शिक्षक भारती, महाराष्ट्र शिक्षक सेना, ग्रेटर मुंबई शिक्षक संघटना, शिक्षक परिषद, राज्य खासगी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघ.