(गणपतीपुळे / वैभव पवार)
विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी रायगड जिल्ह्यातील महाड येथे केलेल्या चवदार तळ्याच्या ऐतिहासिक सत्याग्रह क्रांतीभूमीला वंदन करण्यासाठी रत्नागिरी येथील भिम युवा पॅंथर या सामाजिक संघटनेच्या वतीने विशाल महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली २० मार्च 2023 रोजी सकाळी सात वाजता रत्नागिरी तालुक्यातील निवळी तिठा या ठिकाणाहून निघणार आहे. या ठिकाणी रत्नागिरी तालुक्यातील विविध धार्मिक संस्था- संघटनांच्या गावशाखा सहभागी होणार असून हजारो भीमसैनिकांचे एकीचे दर्शन यावेळी घडून येणार आहे. तसेच मोठ्या संख्येने भीमसैनिक या विशाल महारॅलीत एकवटणार असल्याने खऱ्या अर्थाने रत्नागिरीच्या भिम युवा पॅंथरचे नियोजन यशस्वी ठरणार आहे.
रत्नागिरी तालुक्यातील आंबेडकरी युवकांच्या संकल्पनेतून यंदा प्रथमच या विशाल महारॅलीचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील विविध धार्मिक संस्था, संघटना सहभागी करण्यासाठी भिम युवा पॅंथरच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी तालुक्यातील प्रत्येक गावशाखातील पदाधिकाऱ्यांच्या नुकत्याच भेटीगाठी घेऊन चर्चा करण्याचे काम केले. तसेच महारॅली संदर्भात जाहीर पत्रके काढून त्याचे वाटप विविध गावशाखांमधून करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात भिमसैनिक विशाल महा रॅलीसाठी आपली तयारी दर्शवतील असा दावा रत्नागिरी येथील भिम युवा पॅंथरने केला आहे.
या महारॅलीची जय्यत तयारी रत्नागिरी येथील भिम युवा पँथरने केली असून या महारॅलीत सहभागी होणाऱ्या भिमसैनिकांसाठी चहा, नाश्ता,पाणी याचा सर्व खर्च आयोजक भिम युवा पॅंथरच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. ही विशाल महारॅली यशस्वी करण्यासाठी अधिकाधिक भीमसैनिकांनी महाड येथे येण्यासाठी सहकार्य करावे व महारॅलीमध्ये सहभागी व्हावे असे आव्हान भिम युवा पॅंथरच्या प्रमुख पदाधिकारी व सर्व सदस्यांनी केले आहे.