(मुंबई)
सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. मात्र, यात या ना त्या कारणाने परीक्षेमध्ये गोंधळच झालेला पाहायला मिळत आहे. अशातच नवनीत कंपनीने इयत्ता दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक चुकीचे छापल्याने विद्यार्थ्यांच्या पेपर चुकल्याचा प्रकार काही ठिकाणी घडला आहे. शालेय साहित्य प्रकाशित करणाऱ्या नवनीत प्रकाशकाने दहावीचे वेळापत्रक चुकीचे छापून वाटल्यामुळे अनेक दहावीच्या विद्यार्थ्यांना हिंदीच्या पेपरला मुकावे लागले आहे. दरम्यान, या विद्यार्थ्यांनी संबंधित विषयाची पुन्हा परिक्षा घेण्याची मागणी केली आहे.
इयत्ता दहावी बोर्डाचा हिंदीचा नियोजित पेपर 8 मार्च रोजी होता. मात्र नवनीतने तो पेपर 9 मार्चला छापला होता. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी केवळ नवनीतचे वेळपत्रक पाहिले ते 8 मार्चला या पेपरला गेलेच नाही. त्यामुळे त्यांची हिंदीच्या पेपरला गैरहजेरी लागली. या महत्त्वाच्या परीक्षेच्या वेळापत्रकाबाबात संभ्रम निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांचे वर्षही वाया जाऊ शकते. नवनीतने दिलेल्या चुकीच्या वेळापत्रकामुळे आता हा पेपर चुकलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.