(मुंबई)
काेकण आणि मुंबई परिसरात शनिवारपासून २ दिवस उष्णतेच्या लाटेत तापमान ३९ अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रावर मात्र येत्या साेमवारपासून पुढील ४ दिवस अवकाळी पावसाचे सावट राहणार आहे. मध्य प्रदेशावरील चक्राकार वाऱ्यामुळे राज्यातील वातावरणात हा परिणाम झाला आहे.
अशी असेल वातावरणाची स्थिती
उष्णतेची लाट : ११-१२ मार्च, मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर.
अवकाळी पाऊस
१३ ते १६ मार्च : जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, नगर, परभणी छत्रपती संभाजीनगर १५ ते १६ मार्च नागपूर, गाेंदिया, सातारा, सांगली, लातूर, धाराशिव, हिंगाेली, बुलडाणा.
गोव्यातही उष्णतेची लाट, दुपारी शाळा बंद
हवामान विभागानुसार, उत्तर गोवा आणि दक्षिण गोव्यात शुक्रवारी उष्णतेची लाट होती. दक्षिण गोव्यात शुक्रवारी उष्म्याची लाट होती. ११ मार्चनंतर गोव्याचे तापमान आणखी २-३ अंशांनी घटू शकते. भीषण उष्णता पाहता सरकारने शुक्रवारी आदेश काढून दुपारी भरणारे शाळांचे वर्ग बंद करण्यात आले आहे.
उष्णतेच्या लाटेचा अलर्ट असल्यानं प्रत्येकाने आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याची आश्यकता आहे. बाहेरचं तापमान खूप वाढलं की शरीरातील थर्मोरेग्यूलेशन बिघडतं, शरीरातील क्षार आणि पाण्याचं प्रमाण कमी होतं. यासाठी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत घराबाहेर पडणं टाळावं आणि जर घराबाहेर पडलात, तर सोबत पाण्याची बाटली ठेवण्यास विसरू नका. कडाक्याच्या उन्हात काम केल्याने किंवा शरीरात उष्णता निर्माण झाल्याने त्रास होऊ लागल्यास त्यातील गंभीर प्रकार म्हणजे उष्माघात किंवा ज्याला सनस्ट्रोक किंवा हिटस्ट्रोक असंही म्हटलं जातं.
उष्माघात झाल्यास काय करावं?
उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी जास्त घाम सुटतो. परंतु वातावरणातील आर्द्रता अधिक असल्यास घाम सुकत नाही. यामुळे शरीर थंड होण्याची प्रक्रिया अत्यंत हळू होते. यातूनच उष्माघाताचा धोका वाढतो. मात्र लोकांनी घाबरू नये, मात्र काळजी घ्यावी असंही हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. जास्तीत जास्त पाणी प्यावे. दर तीन ते चार तासाने लघवीला जाणं आवश्यक आहे, त्यासाठी तेवढं पाणी शरीरात जायला हवं. लघवीचा रंग गडद पीवळा असल्यास शरीरात पाण्याची कमतरता आहे असे समजावे. चक्कर येणं, उल्ट्या होणं, मळमळ होणं, शरीराचं तापमान जास्त वाढणं, पोटात कळ येणं, शरीरातील पाणी कमी होणं ही उष्माघाताची लक्षणे आहेत.
उष्माघातावर तातडीचा उपाय
- तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा.
- दरम्यानच्या काळात, त्या व्यक्तीला थंड, सावलीच्या ठिकाणी झोपवावं.
- ओल्या कपड्याने त्याचं शरीर पुसून घ्यावं.
- त्याच्या डोक्यावर साधं पाणी टाकत राहावं.
- एकंदरीत त्याच्या शरीराचं तापमान कमी करण्याचा प्रयत्न करावा.
- त्या व्यक्तीला ORS किंवा लिंबू सरबत द्या.
- त्या व्यक्तीला जवळच्या डॉक्टरकडे ताबडतोब न्या. उष्माघात जीवघेणा ठरू शकतो.
छतावर पक्ष्यांना, घराबाहेर पशूंसाठी पाणी ठेवा
अॅनिमल वेलफेअर बोर्ड आॅफ इंडियाने राज्यघटनेच्या कलम ५१ ए (जी)चा संदर्भ देत केंद्राने सर्व राज्यांंसाठी सूचना जारी केल्या आहेत. यात लिहिले की, राज्य सरकारांनी लोकांना छतावर पक्षी आणि घरासमोर बेवारस पशूंसाठी पाणी भरून ठेवण्यास सांगावे. आपल्याला पक्षी आणि प्राण्यांकडेही लक्ष द्यावे लागणार आहे.