(मुंबई)
काँग्रेसमधील नाराजी नाट्यानंतर आता पक्षात मोठे फेरबदल होणार असल्याच्या चर्चांवर नाना पटोले यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीतील पक्षाच्या तिकीटावरून काँग्रेसच्या नेत्यांमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली होती. सत्यजीत तांबे यांना काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्यामुळं पक्षातील दोन गटात मोठा संघर्ष झाला होता. जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि सत्यजीत तांबे यांनी थेट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता महाराष्ट्र काँग्रेसमध्ये संघटनात्मक पदांवर खांदेपालट होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. नाना पटोले यांचं प्रदेशाध्यपद जाणार असल्याचीही चर्चा सुरू झाली आहे. त्यानंतर आता या सर्व घडामोडींवर खुद्द नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काँग्रेसमध्ये फेरबदल होणार आहे, काँग्रेसच्या शीर्ष नेत्यांनी दिलेली जबाबदारी पार पाडणं ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे. माध्यमांशी बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, काँग्रेसमध्ये गोंधळ निर्माण करण्याचं काम करण्यात आलं होतं. आमच्या नेत्यांमध्ये कोणताही गोंधळ नाही. पक्षात मोठे संघटनात्मक बदल होणार असून शीर्ष नेत्यांकडून जो निर्णय घेण्यात येईल, ते सर्वांना मान्य करावे लागतील, असं म्हणत नाना पटोलेंनी काँग्रेसमधील खांदेपालटाच्या चर्चांवर शिक्कामोर्तब केलं आहे.
याशिवाय काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या चर्चांवर बोलताना नाना पटोले म्हणाले की, माझ्याविरोधात काँग्रेसमध्ये नाराजी नाही, अशा बातम्या केवळ माध्यमांमध्येच सुरू आहेत व त्या पेरल्या जात असल्याचं म्हणत त्यांनी प्रदेशाध्यक्ष बदलाच्या वृत्ताचं खंडन केलं आहे. मात्र आता काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होणार असल्याचे नाना पटोले यांनी दिले आहेत.