(संगमेश्वर)
संगमेश्वर ग्रामीण रूग्णालय अजब कारभारामुळे सातत्याने चर्चेत असते. आता पुन्हा एकदा रुग्णालयाचा ढिसाळ कारभार वेशीवर टांगला गेला आहे. जे घडले ते धक्कादायक असून ग्रामीण रुग्णालयात दाखल असलेल्या एका गरोदर महिलेला आणि अन्य रुग्णांना रुग्णालयातील कॅन्टीन चालकाने तब्बल तीन दिवस नाश्ता आणि जेवण दिलेच नाही. त्यामुळे या कॅन्टीन चालकावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. तसेच रुग्णालय व्यवस्थापनाला या गैर व्यवस्थेबाबत जाब विचारावा आणि कारवाई करावी, अशीही मागणी होत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार संगमेश्वर तालुक्यातील देवरुख चारकेवाडी येथील रहिवासी सौ. लक्ष्मी शांताराम मुंडेकर यांची मुलगी सौ. दिपाली दिपक सुवरे (वय सुमारे ३२) ही महिला गरोदर होती. अचानक पोटात दुखत असल्याने तिला तातडीने देवरूख ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी रूग्णालयात दाखल करून सुद्धा सहा महिन्याचे तिचे बाळ दगावले. त्यानंतर सौ. दिपाली यांना १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.
संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी सौ. दिपाली सुवरे हिला रुग्णालयात दाखल करून तिच्यावर औषधोपचार सुरु केले. दि. ३.३.२०२३ रोजी दाखल केल्यापासून ते दि.५-३.२०२३ असे तिन दिवस रुग्णालयात असणाऱ्या कॅन्टीन चालकाने सौ. सुवरे यांना सकाळचा नाष्टा, चहा, दुपारचे व रात्रीचे जेवण दिलेच नाही. तसेच रुग्णालयात दाखल असलेल्या इतर रुग्णांनाही जेवण दिले नाही. त्यामुळे रुग्णांवर उपासमारीची वेळ आली. या कॅटीन चालकावर तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी नारिकांमधून केली जात आहे.
शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला शासनाकडून मोफत जेवण, चहा-नाष्टा देण्यात येतो. परंतु संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना मोफत जेवण मिळत नसल्याचं सांगितले जात आहे. ग्रामीण रुग्णालयातील कॅन्टीन चालक महिन्यातून काही दिवस रुग्णांना जेवण देतो तर काही दिवस गायब असतो. अशा वेळी रुग्णालयात औषध उपचारासाठी दाखल असणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांना जेवण मिळवण्यासाठी दोन किलोमीटर अंतरावर रिक्षाने जावे लागते. किंवा पायपीट करीत जेवण, चहा-नाष्टा, रात्रीचे जेवण आणावे लागत आहे. या सर्व प्रकाराची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी सौ. लक्ष्मी मुंडेकर यांनी केली आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना दोन वेळेच्या जेवणाविना उपासमारीचा सामना करावा लागत आहे. या प्रकाराबाबत त्यांनी रुग्णालयातील तक्रार वहीत देखील आपली तक्रार नोंद केली आहे.
रुग्णवाहिकेच्या चालकाचे होतेय कौतुक
सौ. लक्ष्मी मुंडेकर व तिची मुलगी सौ. दिपाली सुवरे या दोघांना हि सकाळची चहा-नाष्टा, रात्रीचे जेवण , दुपारचे जेवण मोफत देण्याचे काम संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयातील १०८ रुग्णवाहिका चालक श्री. काशिनाथ फेपडे यांनी केल्याने फेपडे यांचे संगमेश्वर तालुक्यातून कौतुक केले जात आहे.
आश्वासन नको; कठोर कारवाई करा
रुग्णालयात दाखल होणारे रुग्ण गाव वाडीतील असतात. एका गरोदर महिलेबाबत जर असा प्रकार घडत असेल तर सामान्य रुग्णाबाबत या कॅन्टीन चालकाचा व्यवहार कसा असेल याची कल्पना न केलेली बरी. सामान्य रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक याबाबत तक्रार करत नाहीत .याचाच गैरफायदा कॅन्टीन चालक घेत असल्याचे दिसते. दरम्यान या सर्व प्रकरणासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हाधिकारी यांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी होत आहे. प्रशासनाकडून कॅन्टीन चालकाविरोधात केवळ कारवाईचे आश्वासन दिले जाते. मात्र आता या गंभीर प्रकरणावर प्रशासन काय कारवाई करते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.