(रत्नागिरी)
रत्नागिरी – हैदराबाद महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असताना हजारो दुर्मिळ प्रजातींच्या वृक्षावर कुऱ्हाड चालवली जात आहे. निसर्गाच्या या अमूल्य ठेव्याचे संवर्धन करण्यासाठी वृक्षांचे स्थलांतर अथवा पुनर्लागवड करण्यात यावे, अशी मागणी येथील नेचर कन्सर्वेशन सोसायटीने महामार्गाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे.
नेचर कन्सर्वेशनने अधिकाऱ्यांना सांगितले की, रत्नागिरी – हैदराबाद राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू होत असताना आंबा येथून कोल्हापूर कडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे. ५० ते २०० वर्ष आयुर्मान असलेल्या देशी वृक्षांची सरसकट कत्तल केली जात आहे. वृक्ष असण्याचे अनेक फायदे आहेत. शिवाय कीटक, फुलपाखरे, पक्षी, सरीसृप, वन्य प्राणी यांच्या अन्न, निवाऱ्यासाठी वृक्ष गरजेचे आहेत.
शेकडो मोठ मोठे वृक्ष जमीनदोस्त होत असल्याने काही तासातच ही परिसंस्था उध्वस्त होत असल्याने याचे जतन केले पाहिजे. याकामी आम्ही जबाबदारी घेत आहोत. शासकीय यंत्रणेने याकडे डोळसपणे लक्ष द्यावे. यावेळी त्यांनी वृक्षतोड झाल्याने उंच व मोठी झाडे कशी कोसळली गेली आहेत याची छायाचित्रे, तपशील दिला. या भागात ऑर्किड सह काही प्रदेशनिष्ठ वृक्ष आहेत. त्यांचे जतन करण्यात यावे अशी मागणी ही करण्यात आली, या बाबत बोलताना आपण त्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन या अधिकाऱ्यांनी दिले.
.