(मुंबई)
देशात अनेक राज्यांमध्ये कोरोना व्हायरससह ‘एच ३ एन २’ फ्लूच्या घटनांमध्ये अचानक वाढ होत आहे. वाढता संसर्ग आरोग्य तज्ज्ञांसाठी पुन्हा एकदा चिंतेचा विषय बनला आहे. तर होळीचा सण लक्षात घेता सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या चालू असलेल्या सणाच्या होळी व धूलिवंदनातील गर्दीमुळे ‘एच ३ एन २’ चा धोका वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
‘एच ३ एन २’ विषाणू दरवर्षी या काळात बदलतो आणि ड्रॉप्लेटद्वारे पसरतो. जेव्हा हवामान बदलते तेव्हा इन्फ्ल्यूएंझा होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे होळीच्या या सणासुदीच्या काळात सावध राहण्याची गरज आहे. लोकांनी होळी साजरी करावी; परंतु वृद्धांनी विशेषत: सावधगिरी बाळगली पाहिजे, ज्यांना तीव्र श्वसन रोग, हृदय समस्या, मूत्रपिंड समस्या किंवा डायलिसिससारखे गंभीर आजार आहेत. त्यांनी गर्दीच्या ठिकाणी जाण्याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ‘एच ३ एन २’ व्हायरसमध्ये खोकला कमीत कमी तीन आठवड्यापर्यंत राहतो. ज्या रुग्णांना इन्फ्ल्यूएंझा-ए विषाणूच्या ‘एच ३ एन २’ स्ट्रेनची लागण झाली आहे. अशा रुग्णांना २-३ दिवस जास्त ताप येतो. अंगदुखी, डोकेदुखी, घशात जळजळ, याशिवाय रुग्णाला दोन आठवडे सतत खोकला होतो. हे फ्ल्यूच्या सामान्य लक्षणांमध्ये गणले जाते. त्याच बरोबर विषाणूजन्य तापासोबतच सर्दी, खोकला, ब्राँकायटिस या सारख्या गंभीर फुफ्फुसाच्या समस्याही काही रुग्णांमध्ये दिसून येत आहेत. त्याच बरोबर छातीत जड होणे आणि व्हायरल इन्फेक्शनची प्रकरणेही समोर येत आहेत.