(ठाणे)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त ठाण्यात सभा घेतली. यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. त्यात त्यांनी संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ला, मशिदींवरील भोंगे, हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या मुद्द्यावर परखडपणे भाष्य केलं आहे. तर प्रत्येक पक्षाच्या इतिहासात भरती-ओहोटी आलेली आहे, ६५ वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसची आजची अवस्था काय आहे? त्यामुळे आज भरती आहे, तर उद्या ओहोटी येणार हे भाजपनेही लक्षात ठेवावं, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. मनसेच्या कोणत्या पदाधिकाऱ्यांनी कोणत्या विभागात काय काम केलं, कोणती आंदोलनं केली आणि पक्षानं केलेली कार्य यावर डिजिटल पुस्तिका देखील आज राज ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली.
“पाकिस्तानी कलाकारांना आपण ४८ तासात हुसकावून लावलं आणि सो कॉल्ड जे स्वत:ला हिंदुत्ववादी पक्ष म्हणतात ते यावेळी कुठे होते. ते चिंतन करत होते. मशिदींवरील भोंगे असुदे पाकिस्तानी कलाकारांना हाकलवून लावणे असूदे, हे सर्व आंदोलने मनसेने केली. याबद्दल ते (उद्धव ठाकरे) सांगतात आम्ही हिंदुत्व मानतो. हिंदुत्व म्हणजे जपमाळ नाही. भोग्यांची आंदोलने झाली तेव्हा १७ हजार मनसे सैनिकांवर महाराष्ट्रभर केसेस टाकण्यात आल्या. पुढे त्यांना मुख्यमंत्री पदावरुन जाव लागल. यावर २२ मार्चला बोलेन, मशिदींवरच्या भोंग्यांचा समाचार पुढच्या सभेत मी घेणारच आहे” असे राज ठाकरे म्हणाले.
मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर काही दिवसांपूर्वी हल्ला झाला होता. यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, ”त्यादिवशी घटना घडल्यानंतर मी काही बोललो नाही. मला अनेकांनी विचारलं तुम्हाला काय वाटतं? कोणी केलं असेल. एक निश्चित सांगतो, ज्याने हल्ला केला त्याला आधी कळेल आणि मग सगळ्यांना कळेल. आमच्या मुलांचं रक्त असं वाया जाऊ देणार नाही. ते राज्यासाठी काम करायला आले आहेत.”
एक ही है मगर काफी हैं, असा शोले चित्रपटातील संवाद बोलत राज ठाकरे म्हणाले, राजू पाटील हे पक्षाची बाजू विधानसभेत एकटेच मांडत आहेत. विधानसभा भरली तर काय होईल यांचं. ते म्हणाले, ”काही पक्षांना बांधलेले पत्रकार दुसऱ्या पक्षांबाबत गैरसमज पसरवतात. हे पत्रकार आम्हाला जे प्रश्न विचारतात ते इतर पक्षांना विचारणार नाहीत. ते लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करतात.”
दरम्यान, दादर येथील शिवतीर्थावर राज ठाकरे यांची २२ मार्च रोजी सभा आहे. या सभेत कोणाचे वाभाडे काढायचे, कोणावर काय बोलायचं हे, हे सगळं मी त्या सभेत बोलणार असल्याचं राज ठाकरे म्हणाले आहेत. या सभेत राज ठाकरे काय बोलतील आता याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे.