(गुहागर)
शासनाच्या आदेशानुसार स्वच्छ भारत अभिनयाअंर्गत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांत १००% हागणदारीमुक्त गाव म्हणजेच गावात घरोघरी शौचालय व १००% नियमित शौचालयाचा वापर तसेच नियमितपणे घनकचऱ्याचे नॅडेप, खत खड्डे व गांडूळखत द्वारे व्यवस्थापन करणे आणि सांडपाण्याचे शोषखड्डे व परसबागेद्वारे व्यवस्थापन करणे. या अटीतटींचे पद्धतशीरपणे पालन करून हागणदारीमुक्त गाव जी ग्रामपंचायत ग्रामसभेत शपथ घेऊन घोषित करेल त्या ग्रामपंचायतीच्या गावाला हागणदारीमुक्त अधिक गाव म्हणून घोषित करण्यात येईल असे सांगण्यात आले होते.
त्या नुसार सर्व अटीतटींचे पालन करून अत्यावश्यक ती कामे/सुविधा राबवून ग्रामपंचायत उमराठने पुढाकार घेऊन आपल्या उमराठ व उमराठ खुर्द या दोन्ही महसुली गावांत गुहागर तालुक्यात सर्व प्रथम वरील सर्व योजना/ सुविधा राबविण्याचा मान पटकावला असून त्याबद्दल उमराठ गाव हे गुहागर तालुक्यातील पहिले आॅडिओ प्लस गाव म्हणून पंचायत समिती गुहागर तर्फे घोषित करण्यात आले आहे.
बुधवार दि. ८ मार्च २०२३ रोजी ग्रामपंचायत उमराठच्यावतीने उमराठ येथील ग्रामदेवता श्री नवलाई देवीची सहाण येथे दुपारी २.०० वा. घेतलेल्या विशेष ग्रामसभेत अधिक चर्चा होऊन सर्वानुमते खालील प्रमाणे शपथ घेऊन हागणदारीमुक्त अधिक गाव घोषित करण्यात आले होते.
या संदर्भात घेतलेली शपथ – आम्ही उमराठ ता. गुहागर, जि. रत्नागिरी गावातील महसूल गाव उमराठ व उमराठ खुर्द येथील नागरिक असून आमच्याकडे घरोघरी शौचालय आहेत. आम्ही महसूल गाव उमराठ व उमराठ खुर्द गावातील सर्वजण नियमितपणे शौचालयाचा वापर करीत आहोत. उघड्यावर कोणी शौचालयास जात नाही. महसूल गाव उमराठ व उमराठ खुर्द गावात नियमितपणे घनकचऱ्याचे नॅडेप, खत खड्डे व गांडूळखत द्वारे व्यवस्थापन केले जाते तसेच सांडपाण्याचे शोष खड्डे व परसबागेद्वारे व्यवस्थापन केले जाते. मी आज स्वच्छ भारत अभिनयाअंर्गत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांत आम्ही आमचे गाव उमराठ अंतर्गत महसूल गाव उमराठ व उमराठ खुर्द हागणदारीमुक्त अधिक गाव म्हणून आज रोजी घोषित करीत आहोत.
एकंदरीत पंचायत समिती गुहागर तर्फे तालुक्यातील पहिले आॅडिओ प्लस गाव म्हणून उमराठ गाव घोषित केल्याबद्दल तालुक्यात सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. उमराठ गावाला मिळालेल्या या बहुमानाचे संपूर्ण श्रेय हे दोन्ही महसुली गावांतील सर्व वाड्यांतील ग्रामस्थांना, ग्रामसेवक शिद्धेश्वर लेंडवे, उपसरपंच सुरज घाडे व सर्व सदस्य तसेच ग्रामपंचायतीचे असिस्टंट नितीन गावणंग, डाटा आॅपरेटर साईस दवंडे, रोजगार सेवक प्रशांत कदम यांच्या मेहनतीला जाते असे सरपंच जनार्दन आंबेकर यांनी म्हटले आहे.