(रत्नागिरी)
एसएनडीटी महिला विद्यापीठाचा क्रीडा विभाग आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शिरगाव येथील बीसीए कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने आयोजित धाडसी क्रीडा शिबिराची यशस्वी सांगता झाली. रत्नदुर्ग किल्ला, छत्रपती शिवाजी स्टेडियम आणि बीसीए कॉलेज येथे हे शिबिर घेण्यात आले.
सांगता कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिरगाव प्रकल्पाचे सदस्य डॉ. राजीव सप्रे, एसएनडीटी विद्यापीठाच्या क्रीडा समन्वयक बीना पंड्या, शिरगाव प्रकल्पाचे प्रमुख मंदार सावंतदेसाई, प्रकल्प समन्वयक स्वप्नील सावंत, प्र. प्राचार्य स्नेहा कोतवडेकर, मिलिंद तेंडुलकर, जिद्दी माउंटेनिअर्सचे अरविंद नवेले उपस्थित होते. महर्षी कर्वे यांच्या अर्धाकृती पुतळ्याला अभिवादन करून कार्यक्रम सुरू झाला. त्यानंतर विद्यापीठ गीत म्हटले. प्रास्ताविक मिलिंद तेंडुलकर यांनी केले.
डॉ. सप्रे यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थिनींचे कौतुक केले. फक्त अभ्यासापेक्षा धाडसी क्रीडा प्रकार, मैदानी खेळ खेळले पाहिजेत. त्यामुळे माणूस तंदुरुस्त राहतो. विद्यार्थिनींनी याकडे लक्ष द्यावे आणि अशा शिबिरांमध्ये आवर्जून सहभागी व्हावे, असे सांगितले. बीना पंड्या यांनीही शिबिराचे नियोजन आणि येथील सर्व व्यवस्थेबद्दल आनंद व्यक्त केला. मंदार सावंतदेसाई यांनी महर्षी कर्वे संस्थेच्या उत्तम यशस्वी वाटचालीबद्दल माहिती दिली.
या शिबिरात क्रीडाप्रकारानुसार सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनींना गौरवण्यात आले. यात झुमारिंग- पवित्रा मनस्वामी, क्लायबिंग- अर्चना बिंड, रॅपलिंग- राधिका बेर्डे, टेन्ट पिचिंग- ऐमन नूरअहमद, केविंग- वंदना मौर्य, ऑल राउंडर ट्रेकर- सुरभी दुबे, सपोर्टिव्ह ट्रेकर- श्रद्धा जोशी यांचा समावेश होता. या शिबिरासारखी वर्षातून शिबिरे व्हावीत, अशी अपेक्षा विद्यार्थिनींनी व्यक्त केली. तसेच शिबिर काळात महर्षी कर्वे बीसीए कॉलेजने उत्तम व्यवस्थापन केले आणि शिबिर आनंदात झाले, असे आवर्जून सांगितले. या शिबिरामध्ये बी. एम. रुईया कॉलेज, जुहू, डॉ. बी. एम. एन. कॉलेज होमसायन्स, माटुंगा, युएमआयटी जुहू, मनिबेन नानावटी वुमेन्स कॉलेज, विलेपार्ले, एसएनडीटी आर्टस अॅंड कॉमर्स कॉलेज चर्चगेट, एम. डी. शाह कॉलेज मालाड आणि महर्षी कर्वे संस्थेचे बीसीए कॉलेज यामधील विद्यार्थिनींनी अतिशय उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा लोंढे यांनी केले तर झोया काझी यांनी आभार मानले.
फोटो : एसएनडीटी विद्यापीठ व महर्षी कर्वे संस्था आयोजित क्रीडा शिबिराच्या सांगता कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. राजीव सप्रे, मंदार सावंतदेसाई. डावीकडून अरविंद नवेले, डॉ. राजीव सप्रे, स्नेहा कोतवडेकर आणि बिना पंड्या.