(जाकादेवी / वार्ताहर)
८ मार्च जागतिक महिला दिन चाफे येथील मोहिनी मुरारी मयेकर महाविद्यालयात विविध कार्यक्रमांनी उत्साहात संपन्न झाला.
जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ आणि क्रातीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली.
कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक आंतरराष्ट्रीय खेळाडू, अनेक देशांमध्ये भारताचे नेतृत्व करणाऱ्या डॉ. योगिता खाडे यांनी जीवनातील विविध किस्से सांगून शिस्तीचे कसे पालन करावे ? यावर ओघवत्या शैलीत भाष्य केले. स्त्री-पुरुषाने बरोबरीने काम करून पुढे जावे, असे मत व्यक्त करून विशेषतः स्वरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण दिले. त्यांच्यासमवेत राष्ट्रीय खेळाडू स्वप्नाली पवार यांनी कराटे प्रात्यक्षिक करून महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय मनोगतामध्ये महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. स्नेहा पालये यांनी महिला दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देवून स्त्री आणि पुरुष ही दोन चाके आहेत आणि ती दोन्ही चाके समान चालली पाहिजेत,तरच स्त्री आणि पुरुष समानता टिकून राहील, स्त्रीचा सन्मान केला पाहिजे. नात्यांमध्ये जिवंतपणा ठेवणारी अशी व्यक्ती म्हणजेच स्त्री असे मत व्यक्त करुन महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याचे त्यांनी आवाहन केले.
महिला दिनानिमित्त प्रा.कविता जाधव यांच्या संकल्पनेतून माहेर आश्रमाला भेट देऊन गरजूंना आवश्यक कपडे, वही, पेन, बिस्कीटं इत्यादी वस्तू भेट देऊन हा महिला दिन संपन्न झाला. या कार्यक्रमाला संस्थेचे संचालक श्री.सुरेंद्र माचिवले, महाविद्यालयाच्या प्राचार्या स्नेहा पालये, उपप्रचार्य गणेश कुळकर्णी, महिला विकास कक्ष प्रमुख प्रा.कविता जाधव, प्रा शामल करंडे, प्रा. गुरुनाथ सुर्वे, श्वेता पवार व विद्यार्थी उपस्थित होते.