(मुंबई)
जागतिक महिला दिनानिमित्त मुंबई – पुणे ‘डेक्कन क्वीन’ एक्स्प्रेस आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण (महिला विशेष उपनगरीय लोकल) या दोन ट्रेन सर्व महिला कर्मचाऱ्यांसह चालविण्यात आल्या. आशियातील पहिल्या महिला लोको-पायलट सुरेखा यादव यांच्या नेतृत्वाखाली व सहाय्यक लोको पायलट सायली सावर्डेकर यांनी ‘डेक्कन क्वीन’ रेल्वे चालवली. तर लीना फ्रान्सिस यांनी ट्रेनच्या मॅनेजर ची अर्थात गार्डची जबाबदारी पार पाडली. या रेल्वेमध्ये सर्व टीसी या महिला होत्या. जीजी जॉन आणि दीपा वैद्य या दोन मुख्य तिकीट निरीक्षक / कंडक्टर यांच्या नेतृत्वाखाली नीता, रुबिना, बीना, सुरक्षा, रंजुषा आणि जेन या सहा महिला मुख्य प्रवासी तिकीट परीक्षकांच्या पथकाने तिकीट तपासणीचे काम केले.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण (महिला विशेष उपनगरीय लोकल) चं सारथ्य आशिया खंडातील पहिल्या उपनगरीय मोटरवुमन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुमताज काझी यांनी केलं. या लोकल ट्रेनमध्ये मयुरी कांबळे या गार्ड होत्या. यावेळी मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश कुमार गोयल यांनी महिला कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.