(चिपळूण)
चिपळूणहून धामापूर येथे जाण्यासाठी एस. टी. बसमध्ये चढणाऱ्या महिलेच्या पर्समधील तब्बल २ लाख ३० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना आहे. ही घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास येथील मध्यवर्ती बसस्थानकात घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर गुन्ह दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबतची फिर्याद वर्षा प्रदीप महाडीक ( ३८, रा . चिपळूण ) यांनी दिली आहे. वर्षा महाडिक या सोमवारी सायंकाळी ६ वाजता त्यांच्या गावी मुलीसह धामापूर येथे जात होत्या. चिपळूण मध्यवर्ती बसस्थानकातील चिपळूण – धामापूर एस.टी. बसमध्ये त्या चढत असताना त्याच्या खांद्याला लावलेल्या पर्समधील २ लाख ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले. हे दागिने पर्समधील एका स्टीलच्या डब्यात ठेवले होते. पर्सची चेन उघडून अज्ञात चोरट्याने त्यातील डबा चोरून नेला. हा प्रकार महाडिक यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबतची फिर्याद येथील पोलिस स्थानकात दिली याप्रकरणी चिपळूण पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.