(खेड)
निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत दिलेल्या मोठ्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रथमच काल खेडमध्ये जाहीर सभा घेतली. सभेत ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला केला. खेडमध्ये उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी रामदास कदम म्हणाले, आज होळी आहे, शिमगा आहे. हा शिमगा मला राजकीय करायचा नव्हता, पण सुरूवात तुम्ही केली आता त्याचा शेवट मी करणार, असे म्हणत रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांनी थेट इशाराच दिला आहे रामदास कदम यांनी यावेळी बोलताना ठाकरेंचे हात भ्रष्टाचाराने बरबरटलेले आहेत, माझ्या नादाला लागू नका अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. रामदास कदमांवर बोलण्याची भास्कर जाधवची औकात आहे का ? असाही प्रश्नही त्यांनी केला आहे.
यावेळी बोलताना रामदास कदम पुढे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर तुम्ही बेभान झालात. शिवसेना माझी प्रायव्हेट लि. कंपनी आहे, मी म्हणेन तेच होईल, हुकुमशहा प्रवृत्तीसारखे उद्धव ठाकरे वागले. मला बदनाम करण्याचं राजकारण तुम्ही केले. बाप मुख्यमंत्री, बेटा मंत्री आणि नेते बाहेर, आम्हालाही बोलता येते. ज्याच्या हातात धनुष्यबाण तो चोर असं म्हणता. मात्र हे पवित्र धनुष्यबाण तुम्हाला मिळू शकले नाही. भांडुपचा आमदार अशोक पाटील यांनी जाहीर सभेत आमदारकीचा सौदा किती कोटीत झाला हे जाहीरपणे सांगितले होते. तिकीट देण्यासाठी, कापण्यासाठी तुम्ही पैसे घेत असाल तर अशा भ्रष्टाचाराने बरबरटलेल्या हातात धनुष्यबाण राहील का ? ज्याला कावीळ असेल त्याला जग पिवळे दिसते. सुरुवात तुमची, शेवट माझा… मी आता बाहेर पडणार.. अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला भविष्यात द्यावी लागणार आहेत. माझ्या नादाला लागू नका. मी शांत बसलोय, मला डिवचण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या वडिलांच्या विचारांशी बेईमानी तुम्हीच केली आहे. त्या वडिलांचे नाव सांगण्याचा अधिकार तुम्हाला आहे की नाही याचे आत्मपरिक्षण करा. हे चोरलं, ते चोरलं मग तुम्ही झोपलाय का ? असा संतप्त सवाल कदम यांनी यावेळी ठाकरेंना केला. तसेच, माझा मुलगा योगेश कदमांना संपवण्याचं कटकारस्थान हॉस्पिटलमध्ये असताना केले गेले. स्थानिक आमदार असताना पक्षातील नेत्यालाच संपवण्याचं काम तुम्ही केले. तुमच्या सगळ्यांना मी १९ तारखेला उत्तर देणार आहे, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
मागच्या निवडणुकीत मला पाडण्याची सुपारी उद्धव ठाकरेंनी दिली होती. गुहागरच्या राजकारणातून भास्कर जाधव यांना हद्दपार करणार. मतदारसंघातील जनता तुलाच उत्तर देईल. रामदास कदमांवर बोलण्याची भास्कर जाधवची औकात आहे का ? निवडणुकीत जाधवांना तिकीट देण्यास कुणी सांगितले होते. १९९५ साली मी बाळासाहेबांना सांगितले होते तेव्हा भास्कर जाधवांना तिकीट मिळाले. जमिनीवर साष्टांग नमस्कार घालून माझ्या पाया पडला होता, अशी टीका कदम यांनी यावेळी केली.