(खेड)
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंच्या पक्षाला मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिलीच जाहीर सभा खेड येथे घेतली आहे. . या सभेत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजप तसंच एकनाथ शिंदेंना आव्हान देत भाजपा-शिंदे गटावर सडकून टीका केली आहे. रविवारी खेडमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली. उपनेते भास्कर जाधव, विनायक राऊत, सुषमा अंधारे, आमदार अनिल परब, रवींद्र वायकर, वैभव नाईक, राजन साळवी आदी महत्वाचे नेते सभेला उपस्थित होते. या सभेत राष्ट्रवादीचे नेते संजय कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्या सभेवेळी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
गल्लीतलं कुत्र भाजपला विचारत नव्हतं, तेव्हा बाळासाहेबांनी तुम्हाला विचारलं नसतं तर तुम्हाला कुणी ओळखलं असतं?, असा सवाल ठाकरेंनी केला आहे. तर ‘महाराष्ट्र गुलामगिरी सहन करणार नाही. नुसतं मोदींचं नाव वापरून महाराष्ट्रात मत मागून दाखवा. बाळासाहेबांच्या नावाशिवाय मत मागून दाखवा. शिवसेनेची स्थापना माझ्या वडिलांनी केली, निवडणूक आयोगाच्या नाही. निवडणूक आयोगाचा फैसला आम्हाला मान्य नाही. निवडणूक येऊद्या त्यांना ठेचून टाकू. शिवसेना आमची आई आहे. ज्यांना मोठं केलं त्यांनी आपल्या आईवर वार केले. हिंमत असेल चोरलेलं धनुष्यबाण घेऊन तुम्ही मैदानात या, मी मशाल घेऊन मैदानात येतो. निवडणुकीला सामोरं जा,’ असं खूलंआव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजप तसंच एकनाथ शिंदेंना दिलं आहे.
निवडणूक आयोगानं शिवसेना गद्दारांच्या हातात सोपवलीय, तुम्हाला देण्यासाठी आज माझ्याकडे केवळ विश्वास आहे, त्यामुळं स्वातंत्र्यलढ्याशी काहीही संबंध नसलेल्या पाशवी वृत्तीला धडा शिकवण्याची वेळ आली असल्याचं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपसह शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. निवडणूक आयोगानं शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात सोपवली होती, त्यावरही उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. आम्हाला देशद्रोही बोललात तर जीभ हासडून देईन, तर ढेकणं चिरडायला गोळीबाराची गरज नाही, तुमचं एक बोट ढेकणं चिरडायला तुमचं एक बोट पुरेसं आहे, अशा शब्दात भाजपसह शिंदे गटाच्या आमदारांना अस्मान दाखविण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांमध्ये आत्मविश्वास भरला.
खेडमधील ठाकरे गटाच्या सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, केंद्रीय निवडणूक आयुक्त दिल्लीश्वरांचे गुलाम आहेत, त्यांच्या डोळ्यात मोतिंबिंदू झाला असेल तर त्यांनी खेडमध्ये येऊन पाहावं, शिवसेना काय आहे, शिवसेनेची स्थापना निवडणूक आयोगाच्या नाही तर माझ्या वडिलांनी केलेली आहे. त्यामुळं त्यांनी कोणताही चोंबडेपणा करण्याची गरज नाहीये. शिवसेना तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या लक्षात येत नाहीये की ते मराठी माणसांच्या एकजुटीवर घाव घालतायंत. निवडणूक आयोगाचा फैसला आम्हाला मान्य नाही, आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलेलो आहोत, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाच्या निर्णायावर सडकून टीका केली आहे.
‘देशाचे स्वातंत्र्य गोमूत्र शिंपडून मिळालं का? देश म्हणजे दगड धोंडे नाही, देशाचं स्वातंत्र्य गोमूत्र शिंपडून मिळालं नाही. स्वातंत्र्य सैनिकांनी रक्ताचा अभिषेक करून स्वातंत्र्य मिळवलं आहे.भारत मातेला यांच्या गुलामगिरीत अडकू देणार नाही, अशी शपथ घ्या, नाहीतर 2024 ची लोकसभा निवडणूक शेवटची असेल. देशात हुकूमशाही येईल,’ असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
‘हातात धनुष्यबाण घ्या, पण कपाळावर गद्दार हे पुसलं जाणार नाही. आशीर्वाद यात्रा काढत आहेत, चोरांना आशीर्वाद देणार का? भाजपच्या व्यासपीठावर साधू संत दिसायचे, आता संधी साधू दिसतात. पंतप्रधानांना मी पत्र लिहिलं आहे, चौकशीचा ससेमिरा लावला जातोय. दमदाटी भीती दाखवून पक्षात घ्यायचे. विरोधी पक्षात असणारे भ्रष्टाचारी. आज सगळ्यात जास्त भ्रष्टाचारी भाजपमध्ये आहेत. उद्या दिवस फिरले की तुमची काय हालत होईल पाहा,’ अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान काळ्या टोपीवाल्यानं (भगतसिंह कोश्यारी) केला तरीही हे दिल्लीश्वरांसमोर शेपट्या घालून बसलेत, मी घरातून जो महाराष्ट्र संभाळला तुम्ही तो गुवाहाटीत बसूनही संभाळू शकणार नाहीत. अनेक लोकांना अद्यापही खोके मिळालेले नाहीत, त्यामुळं त्यांना सत्ताधाऱ्यांना संभाळणं कठीण होणार आहे, असं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली आहे.