( प्रतिनिधी / रत्नागिरी )
शहरालगत असणाऱ्या गावातील १५ वर्षीय मुलीसोबत शरीरसंबंध ठेवणाऱ्या तरूणाला न्यायालयाने २० वर्षे सश्रम कारावास व ५१ हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. तर पीडितेच्या संगनमताने अपहरण करून तिच्याकडून गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या अन्य दोघांना न्यायालयाने ५ वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी १६ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.
रत्नागिरी अतिरिक्त सत्र व विशेष पॉक्सो न्यायाधीश यांनी या खटल्याचा निकाल दिला. सरकारी पक्षाकडून वकील पुष्पराज वैजयंतीमाला आबासाहेब राऊत शेट्ये यांनी काम पाहिले. अक्षय विष्णू घाडगे (२१, रा. कातळवाडी कुवारबाव) असे २० वर्षे शिक्षा सुनावलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे. तर त्यांची चुलत बहीण आरती संजय घाडगे (२४, रा. खेडशी गयाळवाडी) व आरती हिचा घटस्फोटीत पती गोश्पाक सय्यद उर्फ राजा सय्यद (रा. मिरजोळे एमआयडीसी) अशी शिक्षा सुनावलेल्या अन्य दोघा आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १५ वर्षीय मुलगी आई- वडील यांच्यासोबत राहत होती. २८ डिसेंबर २०२० रोजी ते मजुरीच्या कामासाठी बाहेर गेले होते. दरम्यान दोघेही दोघेही सायंकाळी घरी आल्यानंतर त्यांची १५ वर्षाची मुलगी राहत्या घरी दिसून आली नाही. त्यांनी मित्रपरिवार व नातेवाईकांजवळ चौकशी केली असता त्यांच्या मुलीचा कोणताही थांगपत्ता लागला नाही. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी रत्नागिरी शहर पोलिसांत या घटनेची खबर दिली.
या घटनेचा पोलिसांकडून तपास करण्यात आला असता पीडित मुलगी ही अक्षय याच्यासोबत शहरालगतच्या मिरजोळे एमआयडीसी येथील एका घरामध्ये मिळून आले. पोलीस तपासात संशयित अक्षय घाडगे याने १५ वर्षीय पीडित मुलीसोबत शरीरसंबंध ठेवल्याचे समोर आले होते. तसेच आरती घाडगे व तिचा घटस्फोटीत पती गोश्पाक उर्फ राजा सय्यद हे ६ जानेवारी २०२१ रोजी दुचाकीवरून आपल्याला कोल्हापूर येथे घेवून गेले होते, असे पीडितेने पोलिसांना सांगितले होते. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, शहर पोलिसांनी आरोपी अक्षय घाडगे, आरती घाडगे व गोश्पाक सय्यद यांच्याविरूद्ध भादंवि कलम ३७६, ३६३, ३६५,३६६ (अ) सह ३४ व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ (पॉक्सो) नुसार गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचा तपास शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक मुक्ता भोसले यांनी केला. तसेच तीनही आरोपींविरूद्ध न्यायालयापुढे दोषारोपपत्र ठेवले. आरोपींविरूद्धचे दोषारोप सिद्ध झाल्याने तिघांनाही न्यायालयाने शिक्षा ठोठावली. न्यायालयापुढे पैरवी अधिकारी म्हणून शहर पोलीस ठाण्यातील पोलीस हेडकॉन्स्टेबल सोनाली शिंदे यांनी काम पाहिले.