(गुहागर / प्रतिनिधी)
मागील वर्षी झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर राज्यात शिवसेनेत फूट पडल्याचं पाहायला मिळालं. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे दोन गट पडल्याने पदाधिकारीही फुटले. त्यात शिवसेना कुणाची ही लढाई निवडणूक आयोगापर्यंत गेली. त्यानंतर शिंदे-ठाकरे संघर्षाच्या लढाईत निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदेंच्या बाजूने निकाल दिला आणि शिवसेना- धनुष्यबाण हे शिंदेंकडेच राहील असा निकाल दिला. हा उद्भव ठाकरे यांनाच नाही तर राज्यातील तमाम शिसैनिकांना धक्का होता. अशा परिस्थितीत गुहागर मतदार संघातील गुहागर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान पदाधिकारी आ. भास्करराव जाधव यांच्य कार्यपद्धतीवर विश्वास ठेऊन खेड येथे होणाऱ्या माजी मुख्यमंत्री उद्भव ठाकरे यांच्या जाहीर सभेत ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.
निवडणूक आयोगाच्या निकालानंतर राज्यभरात उद्धव ठाकरे गटाकडून शिवगर्जना यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेतून ठाकरे गटाचे नेते शिवसेना नेत्यांवर आगपाखड करत आहेत. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर उद्भव बाळासाहेब ठाकरे यांची खेड येथे पहिलीच सभा होत आहे. राज्यात ठाकरे यांना सोडून एक एक पदाधिकारी शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जात आहेत. गुहागर मधील ठाकरे गटातील पदाधिऱ्यांनीही शिंदे गटात यापूर्वीच प्रवेश केला आहे. असे वातावरण असताना गुहागर मतदार संघातील चित्र काही वेगळेच पहावयास मिळत आहे.
मात्र, गुहागर विधानसभा संघात आ. भास्करराव जाधव यांचे आजही वर्चस्व कायम असल्याचे दिसून येते. सत्तेत असो वा नसो पण या मतदार संघातील विकासकामांसाठी भरघोस निधी आणण्याची धमक आ. जाधव यांच्यात आहे. त्यांच्या याच काम करण्याच्या पद्धतीमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात वरिष्ठांच्या दुर्लक्षितपणामुळे बाजूला गेलेले गुहागर तालुक्यातील पदाधिकारी आता ठाकरे गटात प्रवेश करत आहेत. या प्रवेशाबाबत आ. जाधव यांच्याशी चर्चा देखील झाल्याचे समजते. या पदाधिकाऱ्यांसोबत तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुतांशी कार्यकर्ते देखील खेड येथे उद्भव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत.